कोरोना काळात होळी खेळताना घ्यायची डोळ्यांची काळजी
- डॉ. शेषचलन नितीन, एमबीबीएस, एमएस, कॅटरॅक्ट व लासिक सर्जन, माक्सिव्हिजन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल्स, हैदराबाद
होळी हा रंगांचा सण उंबरठ्यावर आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच, या वर्षीही या सणावर कोविड-19 महामारीचे सावट आहे. लसीकरण मोहीम सुरू झाली असली तरी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे. हे विचारात घेता, तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ पाहता, सामाजिक अंतर राखून आणि उच्च प्रमाणात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखून आपण या घातक विषाणूचा प्रसार रोखणे गरजेचे आहे. माझ्या मते, यंदा होळी खेळणे टाळलेले बरे किंवा घरामध्ये कुटुंबातील सदस्यांबरोबर होळी खेळावी. परंतु, तरीही बाहेर जाण्याची व खेळण्याची इच्छा असलेल्यांनी मोठ्या संख्येने गोळा होणे टाळणे, नेहमी मास्क वापरणे व सातत्याने सॅनिटायझेशन करणे गरजेचे आहे.
सर्व वयोगटांतील व्यक्ती होळी या सणाचा आनंद घेत असल्या तरी रंग तयार करण्यासाटी केवळ फुले व भाज्या वापरण्याचे दिवस आता राहिले नाहीत. नैसर्गिक व जैविक रंगांचा वापर करण्याविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढत असली तरी अजूनही अनेक लोक आजही स्वस्तातले कृत्रिम रंग वापरतात. हे रंग बाजारात सहजपणे मिळतात. डोळे हा शरीराचा अत्यंत संवेदनशील व सर्वात नाजूक अवयव आहे. विशेषतः होळीसारख्या सणांदरम्यान हे अधिक जाणवते. होळी सुरक्षितपणे खेळण्याला सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवे. पुढे दिलेल्या काही मुद्द्यांबाबत काळजी घ्यावी. डोळे कसे सुरक्षित ठेवावेत, याविषयी मुलांना जागरुक व दक्ष करण्यासाठी मुलांनाही या टिप्स समजावून सांगा.
होळीदरम्यान रंग खेळत असताना तुमच्या डोळ्यांची काळजी घेतली नाही तर डोळ्यांमध्ये चुरचुर किंवा अलर्जी होऊ शकते किंवा तात्पुरता आंधळेपणा येऊ शकतो. आनंदी व सुरक्षित होळी साजरी करण्यासाठी डोळ्यांची काळजी घेण्याच्या टिप्स पुढे दिल्या आहेत:
सनग्लासेस वापरा :- सर्वात पहिली आणि महत्त्वाची बाब म्हणजे डोळे झाकलेले ठेवा. यासाठी सनग्लासेस उपयोगी ठरू शकतात. एखाद्याने तुमच्या तोंडावर रंग टाकला तर सर्वात आधी डोळे बंद करा आणि शक्यतो हाताने डोळे झाकण्याचा प्रयत्न करा.
चांगलं मॉइश्चरायझर वापरा :- कोणताही रंग जाऊ नये म्हणून डोळ्यांभोवता चांगले मॉइश्चरायझर किंवा कोल्ड क्रीम लावा. यासाठी खोबरेल तेलही वापरले जाते. क्रीममध्ये तेलकट क्रीमचा समावेश असल्याने ते होळीच्या रंगांपासून संरक्षण करते. हे क्रीम रंगाचा त्वचेशी थेट संपर्क येण्यापासून सुरक्षित ठेवते, तसेच नंतररंग धुण्यासाठी मदत करते.
काँटॅक्ट लेन्स वापरू नका :- होळी खेळत असताना घ्यायची आणखी महत्त्वाची काळजी म्हणजे काँटॅक्ट लेन्स वापरू नयेत. लेन्स आणि डोळा यामध्ये रंग अडकून राहण्याची शक्यता असते आणि हे घातक ठरू शकते. तरीही तुम्ही होळी खेळत असताना लेन्सेस वापरायचे ठरवले तर होळी खेळून झाल्यावर कृपया ते लेन्सेसची विल्हेवाट लावा.
डोळे चोळू नका :- डोळ्यांमध्ये रंग गेला तर सर्वप्रथम स्वच्छ व शक्यतो थंड पाण्याने दोन ते तीन वेळा डोळे धुवा. डोळे चुरचुरत असले तरी ते चोळू नका. डोळे चोळल्यामुळे अधिक त्रास होऊ शकतो. पुढील उपचारांसाठी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टना भेटा.
मोकळे केस बांधा :- होळी खेळत असताना तुमचे केस बांधा. होळी खेळताना केस ओले झाले तर त्यामुळे डोळ्यांमध्ये रंगांचे थेंब पडू शकतात. होळी खेळत असतानाची ही मूलभूत आणि प्रभावी बाब आहे. होळी खेळण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी केसांना तेल लावा, म्हणजे नंतर रंग धुवून टाकणे सोपे होते.
नैसर्गिक रंग वापरा :- कृत्रिम रंगांमध्ये विषारी धातूचे प्रमाण जास्त असते, जसे शिसे. यामुळे डोळे लाल होणे, डोळ्यांची अलर्जी किंवा डोळ्यांच्या पृष्ठभागांचे घर्षण होते. होळ सुरक्षित खेळण्यासाठी हे टाळावे.
पाण्याचे फुगे वापरणे टाळा :- होळी खेळत असताना सर्वांना पाण्याचे फुगे आवडतात. परंतु, ते घातक असतात आणि त्यामुळे ब्लंट आय ट्रॉमा होऊ शकतो.
या सगळ्या टिप्स वापरा आणि सुरक्षित आणि आनंदी होळी साजरी करा!