आरोग्य

‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या औषधाच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता

नवी दिल्ली : देशभरात कोरोना दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता अधिक भासत आहे. पण यादरम्यानच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (‘डीआरडीओ’) ने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक औषधाला केंद्र सरकारच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजन कमी झालेल्या रुग्णांसाठी डीआरडीओचे हे औषध उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे.

डीआरडीओच्या औषधाचे नाव २ डीऑक्सिजी-डी ग्लुकोज ((2-DG) 2-deoxy-D-glucose) असे आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद स्थित डॉ. रेड्डीज लॅबोरिटरीजच्या सहकार्याने 2-DG हे कोरोना प्रतिबंधात्मक औषध बनवण्यात येत आहे. गेल्या वर्षभरापासून या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल सुरू होत्या. विशेष म्हणजे ज्या रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला, त्यातील ४२ टक्के रुग्णांना तिसऱ्या दिवशी ऑक्सिजनची गरज भासली नाही. तसेच ते रुग्ण लवकरच बरे झाले. शिवाय या औषधाचा ६५ वर्षांवरील रुग्णांवरही चांगला प्रभाव दिसून आला. हे औषध इंजेक्शन नसून तोंडाद्वारे घेता येणारे आहे.

कोरोनाच्या सुरुवातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी तयारी करण्याची आवाहन विविध घटकांना केले होते. तेव्हा एप्रिल २०२०मध्ये डीआरडीओने 2-DG औषधावर काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर या औषधाचे क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात आले. हे औषध कोरोना विषाणूवर प्रभावीपणे काम करत असल्याचे समोर आले. मग मे २०२०मध्ये औषधाच्या फेज-२ क्लिनिकल ट्रायलला परवानगी दिली. डीआरडीओ आणि डॉ. रेड्डीज मिळून मे-ऑक्टोबर २०२०मध्ये फेज-२च्या ट्रायलला सुरू केली होती. ही ट्रायल ६ रुग्णालयांमध्ये केली असून त्यामधील ११० रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button