कोरोनाच्या संकटात झायडस कॅडिलाच्या ‘विराफिन’ औषधाला मंजुरी

नवी दिल्ली: एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी झायडस कॅडिलाच्या ‘विराफिन’ (Virafin) या अँटिव्हायरल औषधाला मंजुरी दिली आहे.
झायडस कॅडिलाचं इंटरफेरॉन अल्फा – 2 बी Interferon alpha-2b म्हणजे Virafin हे अँटिव्हायरल औषध PegIFN म्हणूनही हे ओळखलं जातं. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी अशी मागणी कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे (DCGI) केली होती. डीसीजीआयने या औषधाला मंजुरी दिली आहे. आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे. झायडस कॅडिला ही अहमदाबादमधील औषध कंपनी. हिपेटायटिस सी साठी हे औषध तयार करण्यात आलं होतं. १० वर्षांपूर्वी या यकृतासंबंधी आजारावर उपचारासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली होती. आता हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीने केली होती.
या औषधामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो, असा दावा कंपनीने केला आहे. या औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ज्या रुग्णांना औषध देण्यात आलं, त्यापैकी ९१.१५ टक्के रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी ७ दिवसांतच निगेटिव्ह आली, असं कंपनीने सांगतिलं आहे. औषधामुळे आजारामुळे निर्माण होणारी गुंतागुंतही कमी होते. शिवाय रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्याचा कालावधीही कमी होतो, असं कंपनीनं सांगितलं.




