अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या ईडी कोठडीत ६ जुलैपर्यंत वाढ
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्या ईडी कोठडीत स्पेशल पीएमएलए कोर्टाने पाच दिवसांची वाढ केली असून या दोघांना ६ जुलैपर्यंत ईडी कोठडी असणार आहे.
अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि सहाय्यक संजीव पालांडे यांना ईडीने पीएमएलए कायद्याखाली २६ जून रोजी अटक केली होती. आज त्यांना पीएमएलए कोर्ट नंबर १६ येथे दुसऱ्या रिमांडकरिता आणण्यात आलं होतं. यावेळी ईडीने आणखी सात दिवस कोठडी मिळावी असं कोर्टात सांगितलं. कोर्टाने ६ जुलैपर्यंत कोठडी वाढवून दिली आहे.
हे दुसरे रिमांड आहे. आम्हाला आणखी सात दिवस कोठडी मिळावी. वरील तपास पूर्ण झालेला नसून या सात दिवसांत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोस्टिंग, बारचे पैसे गोळा करणारे या प्रकरणांचा समावेश आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए आणि पीएस असल्याने या दोघांनी याप्रकरणात मुख्य भूमिका बजावली आहे, असा युक्तीवाद ईडीने केला.
आमच्याकडे सचिन वाझे याचा जबाब असून त्याबाबत तपास करावयाचा आहे. माजी मंत्र्यांच्या खात्यात पैसे जात होते. हे सर्व पैसे रोख रकमेमध्ये जमा करण्यात आले. वरील प्रकरणात काही संशयितांचा तपास अपूर्ण आहे आहे, असं देखील ईडीने कोर्टात सांगितलं.