मालकाच्या कर्तृत्वाचे असे धिंडवडे काढू नयेत; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : यास चक्रीवादळाने पश्चिम बंगालला जोरदार तडाखा दिला. अळावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जवळपास 30 तास मंत्रालयात कंट्रोल रुममध्ये ठाण मांडून होत्या. राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर त्यांनी लक्ष ठेवलं. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर यास धडकण्यापूर्वी मंगळवारी तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी मंत्रालयातच ठाण मांडून बसणार आहेत, अशी माहिती देण्यात आली होती. याबाबत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये छापण्यात आली. हाच धागा पकडून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना जोरदार टोला लगावलाय.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन संजय राऊत यांना टोला हाणलाय. त्याचबरोबर त्यांनी तौक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्यावरही टीका केलीय. “संजय राऊतांचा काय राग आहे कोण जाणे उद्धवजींवर. तौक्ते वादळाच्या काळात उद्धव ठाकरे घरी दडी मरून बसलेले हे सांगण्याची काय तऱ्हा आहे पाहा… सामानाची बातमी… ‘यास वादळाचा धोका, ममता रात्रभर मंत्रालयात ठाण मांडणार.’ मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये”, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1397492823134330881
‘सामना’तील बातमी काय?
यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी रात्री मंत्रलयातच ठाण मांडून राहिल्या. नियंत्रण कक्षातून त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदतीबाबत योग्य सूचनाही केल्या. ममता बॅनर्जी मंगळवारी मंत्रालयातच थांबणार असल्याची बातमी सामनात छापण्यात आली आहे. या बातमीमध्ये ममता बॅनर्जी यांचं कौतुकही करण्यात आलंय.




