रामदास कदम, योगेश कदम समर्थकांची हकालपट्टी; रत्नागिरीत शिवसेनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर
मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांना त्यांचे वादग्रस्त ऑडिओ क्लीप प्रकरण आता चांगलेच भोवल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून, तत्काळ त्यांच्या पदांवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांना मोठा झटका बसल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेनेत पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जागा नाही हे पुन्हा एकदा शिवसेना पक्ष प्रमुखांनी ठामपणे दाखवून दिल्याचीही चर्चा सध्या शिवसेनेत सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्या निवडणुकांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र भाजप विरोधात लढतील या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्थानिक खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
नवीन कार्यकारिणी
– राजू निगुडकर – उपजिल्हाप्रमुख,उत्तर रत्नागिरी
– किशोर देसाई – विधानसभा क्षेत्रप्रमुख, दापोली विधानसभा
– ऋषिकेश गुजर – तालुकाप्रमुख, दापोली तालुका
– संतोष गोवले – तालुकाप्रमुख, मंडणगड तालुका
– संदीप चव्हाण – शहरप्रमुख, दापोली शहर
– विक्रांत गवळी – उपशहरप्रमुख, दापोली शहर
विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेनं एकाच दगडात निशाणा साधून पक्षासोबत एकनिष्ठ न राहणाऱ्यांना धडा शिकवला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली, तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजपला रसद पुरवणाऱ्या रामदास कदम यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.