Top Newsराजकारण

राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; शिवसेनेची पंतप्रधान मोदींकडे मागणी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत. तसेच, नाशिक, पुणे आणि महाडमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यातच नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, असे पत्र शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. अशी भाषा सहन करू नये, शिष्टाचार राखला पाहिजे, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

युवासेनेला आदेश; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

नारायण राणेंच्या विधानानंतर महाड, नाशिक, पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विरोधात आणखी एफआयआर दाखल होऊ शकतात. युवासेनेला तसे स्पष्ट आदेश वरिष्ठांकडून मिळाले आहेत. त्यामुळे राज्यभरात युवासैनिकांकडून राणेंविरोधात एफआयआर दाखल होण्याची शक्यता आहे. राणेंना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची रणनीती शिवसेनेनं आखली आहे. शिवसैनिक आज राज्यभरात आंदोलनं करण्याच्या तयारीत आहेत.

अटक टाळण्यासाठी राणेंची चाचपणी

नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश निघाल्यानंतर चिपळूणमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. राणे सध्या चिपळूणमध्ये आहेत. अटक टाळण्यासाठी त्यांनी चाचपणी सुरू केल्याचं समजतं. अटक टाळण्यासाठी कोणते कायदेशीर पर्याय असू शकतात, याची चाचपणी राणेंच्या लीगल टीमकडून सुरू आहे.

राणे अटक करून घेणार की…?

राणेंच्या लीगल टीमकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असताना भाजप नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. राणेंच्या अटकेचा राजकीय फायदा मिळवायचा की अटक टाळण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावयाची, यातला नेमका कोणता पर्याय भाजप स्वीकारणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button