परीक्षा ही जीवनाला आकार देण्याची एक संधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परीक्षा ही शेवटची संधी नाही. उलट परीक्षा ही एकप्रकारे संधी आहे. परीक्षा ही समस्या तेव्हा असते, जेव्हा परीक्षेला आपण जीवनाच्या स्वप्नाचा अंत पाहतो. खर म्हणजेे परीक्षा जीवन घडवण्याची एक संधी आहे. या संधीला त्याच पद्धतीने पहायला हवे. आपल्यासमोर कसोटीच्या रूपात उभ्या राहणाऱ्या परीक्षेचे संधीत रूपांतर करायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
पंतप्रधान मोदी यांनी शालेय-महाविद्यालयीन परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी खास संवाद साधला. मुलांना तणामुक्त होऊन परीक्षा कशी द्यायची याचा कानमंत्र देतानाच आनंदी आणि उत्साही राहण्याचं गुपितही सांगितलं. पंतप्रधान मोदी यांनी ‘परीक्षे पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देऊन त्यांच्या शंकांचं निरसनही केलं. या कसोटीच्या काळात स्वतःला कसायचं आहे, पळायचं नाही असाही विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात पालकांचा कमी होणाऱ्या सहभागाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचा कानमंत्रंही दिला. फावल्या वेळेला फावला वेळ समजू नका. फावला वेळ हा तुमच्यासाठी खजिना आहे. रिकामा वेळ म्हणजे एक प्रकारचं सौभाग्यच आहे. फावला वेळ नसेल तर आयुष्य रोबोट सारखं होऊन जातं, असं सांगतानाच जर झोपाळ्यावर झुलायची इच्छा होत असेल तर बिनधास्तपणे झोक्यावर बसण्याचा आनंद घ्या. मला फावल्यावेळेत झोपाळ्यावर झुलायला आवडतं. मी झोपाळ्यावर बसतो. त्यातून मला आनंद मिळतो, असं मोदी म्हणाले.
पालक आता पूर्वीसारखे पाल्याच्या अभ्यासात लक्ष देत नाही, याचे कारण म्हणजे ते अनेकदा आपआपल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळेच पूर्वीच्या काळी जसे आईवडील हे मुलांसोबत चर्चा करायचे हे आता दिसत नाही. सध्या पालकांची चर्चा ही मुलांच्या करिअरच्या निमित्ताने होत असते. आपल्या मुलांना किती गुण मिळतात याकडेच पालकांचे लक्ष असते. त्यामुळेच आपल्या मुलांच्या सामर्थ्याची माहिती पालकांना नसते. त्यासाठीच मुलांच्या सामर्थ्याचा शोध पालकांनी घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले. मुलांचे आकलन निकालापुरते मर्यादित नसावे यासाठी पालकांनी मेहनत घ्यायला हवी. मार्कांपेक्षा अनेक गोष्टी आहे ज्या गोष्टी पालक करत नाहीत. यावेळी मोदींनी पालकांनाही सल्ला दिला. शिक्षणाच्या बाबतीत मुलांना कधीच ताण देऊ नका. त्यांना घरातून ताण राहिला नाही तर त्यांच्यावर परीक्षेचाही ताण येणार नाही. मुलांना घरात तणावमुक्त ठेवा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल, असंही ते म्हणाले.
मुलं खूप स्मार्ट असतात. तुम्ही जे सांगाल ते ही मुलं करतीलच असं नाही. मात्र एक गोष्ट नक्की की तुम्ही जी गोष्ट करत आहात, त्याचं ते अत्यंत बारकाईने निरीक्षण करत असतात आणि तुमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात, असंही मोदींनी सांगितलं. यावेळी त्यांनी पालकांना सांगितलं की मुलांच्या मागे सतत धावावं लागतं. कारणं ते आपल्यापेक्षाही वेगवान असतात. मुलांना काही गोष्टी सांगण्याची, त्यांना काही शिकवण्याची आणि त्यांना संस्कार देण्याची जबाबदारी कुटुंबाची असते. मात्र, कुटुंबातील मोठी व्यक्ती म्हणून बऱ्याचदा आपणही आपलं मूल्यमापन केलं पाहिजे. तुमचा मुलगा परावलंबी होता कामा नये. तो स्वयंप्रकाशित झाला पाहिजे. मुलांमध्ये जी ज्योत तुम्ही पाहात आहात. ती ज्योत त्यांच्या मनात प्रकाशमान झाली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
परीक्षेच्या बाबतीत कोणतीही भीती बाळगायची गोष्ट नाही. अनेकदा आपल्याला संपुर्ण शैक्षणिक वर्षाच्या कालावधीत कधी परीक्षा होणार याची कल्पना असते. त्यामुळेच परीक्षेच्या कालावधीत आवश्यकतेपेक्षा अधिक विचार करण्याची गरज नाही असाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा हा आपल्या आयुष्यातील अनेक टप्प्यांपैकी एक टप्पा आहे. त्यामुळेच बाहेरचा दबाव कमी घेत, तणावमुक्त जगायला शिकता आले पाहिजे असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
इन्व्हॉल्व, इंटर्नलाईज, असोसिएट आणि व्हिज्यूअलाईज, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा फॉर्म्युला सर्वात महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युल्यामुळे तुमचं मन शांत होईल, असं ते म्हणाले. जेव्हा तुमचं मन सैरभैर असतं. तुमचं चित्त ठिकाण्यावर नसतं, तेव्हा प्रश्न पत्रिका पाहून तुम्ही उत्तरं विसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे तुम्ही तुमचं सर्व टेन्शन परीक्षा केंद्राच्या बाहेर सोडूनच परीक्षेला बसा. बघा किती फरक पडतो ते, असं त्यांनी सांगितलं.
मोदींचे मार्मिक उत्तर
या कार्यक्रमात एका विद्यार्थिनीने खूप अभ्यास केल्यानंतरही लक्षात राहत नाही. त्यामुळे उत्तरं लक्षात राहावं यासाठी काय करावं? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं मोदी यांनी मार्मिकपणे उत्तर दिलं. आपल्याला मेमरीची जडीबुटी पाहिजे तर? तुम्ही सर्वात आधी तुमच्या मेमरीतून ही भावनाच डिलीट करुन टाका की, तुम्हाला लक्षात राहत नाही. असा तुम्ही विचारच करु नका. तुम्ही जर स्वत:शी संबंधित काही घटना बघितल्या तर तुम्हाला माहित पडेल की, वास्तवात तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात राहतात. जसे की तुमची मातृभाषा. मातृभाषा तुम्हाला कुणी शिकवली होती का? कोणत्याही पुस्तकात याबाबत माहिती नाही. सगळं ऐकूण आपण शिकतो. तुम्हाला जे पसंत आहे ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले होते? ज्या गोष्टी तुमच्या आयुष्याच्या अविभाज्य घटक बनतात त्यांचा कधीच विसर पडत नाही. यासाठी इन्टरलाईज करणं जास्त गरजेचं आहे. अभ्यासाला पाठांतर करण्यापेक्षा त्याला अनुभवा. तुमच्याकडे चांगलं सामर्थ्य आहे.