Top Newsराजकारण

वानखेडेंच्या बचावासाठी पुराव्याला पुराव्यानेच उत्तर; कुटुंब सरसावले !

मुंबई : एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत. त्यांचं खरं नाव समीर दाऊद वानखेडे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक कथित जन्मदाखल्याचा फोटो ट्विट केला आहे. त्या कथित जन्म दाखल्यामध्ये १४ डिसेंबर १९७९ अशी तारीख दिसत असून समीर आणि मुस्लिम असं इंग्रजीत लिहिलेलं दिसतं आहे. मात्र, आता ज्ञानदेव वानखेडेंनी पुराव्यानेच पुराव्याला उत्तर दिलंय. त्यांनी नावाची ओळख सांगणारी अख्खी फाईलच वाचून दाखवली आहे.

माझ्या नातवाच्या जन्म दाखल्यावर समीर ज्ञानदेव वानखेडे हे नाव स्पष्ट दिसतंय. म्हणजे, माझ्या नातवाच्या दाखल्यावरही त्याच्या वडिलांच पूर्ण नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असंच आहे. माझं निवडणूक ओळखपत्र आहे, त्यावरही माझं नाव ज्ञानदेव हेच आहे. माझ्या पत्नीच्या मृत्यूपूर्वीचे हे कागदपत्र आहे, त्यावरही झाहिदा ज्ञानदेव वानखेडे असंच लिहिलेल आहे, त्यामध्ये तिने स्वखुशीने धर्म बदलल्याचंही सांगितलंय, अशा विविध कागदपत्रांचा पुरावाच ज्ञानदेव वानखेडे यांनी मीडियासमोर दाखवला आहे. त्यामुळे, नवाब मलिक हे स्पष्टपणे खोटं बोलत आहेत, हे दिसून येत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

माझं नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे, माझं नाव दाऊद कसं झालं हे मला माहिती नाही. माझ्याकडे शाळेपासून ते डिपार्टमेंट जॉईन केल्यापर्यंतचे अनेक पुरावे आहेत, ज्यामध्ये माझं नाव ज्ञानदेवच आहे, असे समीर यांच्या वडिलांनी सांगितले. तसेच, जावयाला आत टाकल्यापासून मलिक समीरच्या मागे लागलाय. तो मंत्री आहे, सरकार त्याचं आहे, तो मोठा माणूसयं, मग तो काहीही करू शकतो. नाव बदलू शकतो, जन्म दाखलाही बदलू शकतो, असे म्हणत ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या वर्तणुकीवर टीका केली आहे.

माझा मुलगा स्वच्छ चारित्र्याचा आहे, मी आत्ताही फोटो दाखवू शकतो. माझं गावातलं घर कुडाचं आहे, जर हा पैसे घेणारा असता तर आज आम्ही श्रीमंत असतो. गेल्या १५ वर्षात याने कधीही पैसे घेतले नाहीत, अन् पुढेही घेणार नाही. माझं गाव बघा, माझे नातेवाईक बघा… असे म्हणत समीर वानखेडे यांच्या वडिलांनी आपली परिस्थिती सांगताना, समीर स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी असल्याचं म्हटलंय. माझा मुलगा वकील आहे, त्याच्या जिद्द आहे, तो देशसेवा करतोय. पण, असे आरोप होत असतील, जीवावर बेतत असेल तर हे सगळं प्रकरण संपल्यावर मी त्याला राजीनामा द्यायला सांगेन, असेही ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटलं आहे.

मी आणि समीर जन्मतः हिंदू आहोत; क्रांती रेडकरचा खुलासा

समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरनेही ट्विटवर सत्य सांगितलं आहे. ट्विटरवर क्रांतीने सांगितलं की, ”मी आणि समीर दोघेही जन्मतः हिंदू आहोत आणि दोघांचेही हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न झाले आहे. आम्ही इतर कोणत्याही धर्मामध्ये कधीच धर्मांतर केलं नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू आहेत आणि त्यांनी माझ्या मुस्लीम सासूशी लग्न केलं होतं. समीरने २०१६ मध्ये पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता आणि २०१७ मध्ये आम्ही हिंदू पद्धतीने लग्न केलं आहे. समीरचं पहिलं लग्न स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट अंतर्गत झालं होतं. आमचं लग्न हिंदू मॅरेज अ‍ॅक्टनुसार २०१७ मध्ये झालं, असंही क्रांतीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

क्रांती रेडकरने दोन फोटो ट्विट केले आहेत. पहिला फोटो लग्नाचा आहे. या फोटोत समीर वानखेडे क्रांतीच्या गळ्यात हार घालताना दिसत आहेत. तर, दुसरा फोटोही लग्नाचाच असून लग्न झाल्यानंतरचा हा फॅमिली फोटो आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button