राजकारण

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत चूक; १४ पोलीस कर्मचारी निलंबित

ग्वालियर : राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत मोठी चूक केल्याचं उघड झालं आहे. दिल्लीहून ग्वालियरच्या दिशेने जाणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांची कार निरावली गावापासून हजीरा चौकापर्यंत जवळपास ७ किमी विनासुरक्षा एकटीच जात होती. या निष्काळजीपणामुळे ग्वालियर आणि मुरैना पोलीस ठाण्यातील १४ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा ज्योतिरादित्य शिंदे यांची कार सोडून दुसऱ्याच गाडीमागे पायलटिंग करत होती. रात्रीच्या वेळी मलगढा तिराहाजवळ हजीरा पोलीस स्टेशनचे अधिकारी आलोक परिहार यांनी शिंदे यांची गाडी एकटीच जात असल्याचं पाहताच ते स्वत: सुरक्षेसाठी शिंदे यांच्या गाडीमागून जयविलास पॅलेस पर्यंत पोहचले. राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीहून ग्वालियरला येत होते. दिल्लीहून निघाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ताफ्याला प्रत्येक जिल्ह्यातून पायलट वाहन मिळत होतं. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात एन्ट्री करताना पायलट कार शिंदे यांच्या गाडी पुढून जात होती. त्यानंतर निरावली पॉँईटपर्यंत पोलिसांची गाडी शिंदे यांच्यासोबतच होती. याठिकाणी ग्वालियर पोलिसांची गाडी शिंदे यांच्या गाडीच्या ताफ्यात जाण्याच्या तयारीत होती. परंतु या ठिकाणी दोन जिल्ह्यातील पोलिसांमध्ये ताळमेळ झाला नाही. आणि ग्वालियर पोलिसांची टीम दुसऱ्याच कारच्या मागे पायलटिंग करत गेली. पुढे गेल्यानंतर पोलिसांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. परंतु तोपर्यंत ज्योतिरादित्य शिंदे यांची गाडी खूप दूरपर्यंत निघून गेली होती.

ग्वालियर जिल्ह्यातील निरावली गाव ते हजीरा चौकापर्यंत ज्योतिरादित्य शिंदे यांची गाडी विनासुरक्षा प्रवास करत राहिली. जवळपास ७ किमी प्रवास विनासुरक्षा केला. जेव्हा शिंदे यांची गाडी हजीरा येथून जात होती. तेव्हा पोलीस अधिकारी आलोक सिंह परिहार यांची नजर त्यांच्या गाडीवर गेली. त्यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ज्योतिरादित्य शिंदे यांना सुरक्षा देत त्यांना जयविलास पॅलेसपर्यंत पोहचवलं.

ज्योतिरादित्य शिंदे यांची गाडी विनासुरक्षा जात असल्याचं उघड होताच पोलीस विभागातंर्गत चौकशी करण्यात आली. त्यात ग्वालियर आणि मुरैना येथील पोलीस कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणावर ठपका ठेवण्यात आला. मुरैना जिल्ह्यातून खासदार रवाना झाले तेव्हा त्यांच्या पायलटिंग वाहनात ९ पोलीस कर्मचारी होते. तर ग्वालियर जिल्ह्यातील सीमेत शिंदे यांना घेऊन जाण्यासाठी ५ कर्मचारी होते. या दोन्ही टीमचं आपापसात संवाद झाला नाही. ताळमेळ नसल्याने ग्वालियरच्या टीमनं दुसऱ्याच गाडीला फॉलो करत राहिली. त्यामुळे या प्रकारात १४ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button