
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबविण्याचा आदेश दिलेला आहे, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे आपली लालपरी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. संप करून तिला पुन्हा आर्थिक गर्तेत लोटू नका. सध्या एसटीचा संचित तोटा १२००० कोटी रुपयांपर्यंत पोहचलेला आहे. असे असतांना देखील, सर्व कर्मचा-यांचे गेल्या १८ महिन्याचे वेतन एसटी महामंडळाने अदा केले आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत ३५४९ कोटी रुपयांचा आर्थिक निधी प्राप्त झाला आहे. यापुढे देखील आपल्या सर्वांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
कर्मचारी बांधवांनो…. आंदोलनातील आपल्या मागणीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता (२८ टक्के ) व घरभाडे भत्ता (८, १६, २४ टक्के ) मान्य केले आहे. तसेच दिवाळी भेट ही दिली आहे. असे असुन देखील अचानकपणे पुढे आलेल्या ज्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरु आहे, त्या मागणीबाबत एसटी महामंडळ आणि राज्य शासन मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे प्रामाणिकपणे अनुपालन करत आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीने आपले कार्य सुरु केले आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
बंधु भगिनींनो…. आपण संप मागे घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुध्दा विनंती केली आहे. आपल्या संपामुळे महामंडळाला दररोज १५ ते २० कोटी रुपयांचा तोटा होत आहे. अर्थात, संपाचा विपरीत आर्थिक परिणाम संस्था आणि संस्थेचे कर्मचारी म्हणुन आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. संपामुळे गेली कित्येक दिवस सर्व सामान्य प्रवाशी जनतेचे अतोनात हाल होत आहेत. या सर्वांचा विचार करुन आपण तातडीने संप मागे घ्यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा रुजु व्हावे हीच आपणांस विनंती, असल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा सरकारविरोधात थाळीनाद
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणि राज्य सरकारचा आंदोलन संपवण्याचा हट्ट यात कर्मचाऱ्यांचं कुटुंबीय भरडले जात आहे. आधीच महागाई भत्ता आणि अॅडव्हान्स पे एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं दिला नाही. त्यातच पगारात नेहमीच होणारी अनियमितता यामुळे कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबाचा जीव मेटाकुटीला आलाय. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुबांनीही आंदोलनाच्या लढ्यात उतरण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात स्वारगेटमधील एसटी कॉलनी येथे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आज सकाळी थाळीनाद केला. लहानांपासून ते वृध्दांपर्यंत सर्व यात सहभागी झाले होते. आधीच बारा-पंधरा हजार पगार असताना त्यातलेही चार ते पाच हजार टॅक्समध्ये कापले जातात. हाती येणारा पगार धड खायला पण पुरत नाही आणि धड राहायला पण पुरत नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी ही दशा महामंडळापुढे मांडण्याचा खूप प्रयत्न केला. पण बारा – तेरा तासांची निमूटपणे आहे त्या पगारात नोकरी करण्यावर महामंडळाने कर्मचाऱ्यांचा छळ चालवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं कुटुंब सण समारंभही साजरे करु शकत नाही. मुलांना चांगलं शिक्षणही देऊ शकत नाही. या सर्व जाचाला कंटाळून आता एसटी कर्मचाऱ्यांचं कुटुंबही सरकारपुढे लढ्यासाठी उभं ठाकलं आहे.
राज्यभर होत असलेल्या या आंदोलनात प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याचं कुटुंब सामील झाल्यास सरकारपुढे मोठा पेच निर्माण होण्याची चिन्हं आहेत. उच्च न्यायलयात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आणि राज्य सरकारमध्ये विलनीकरणाचा तिढा सुटला नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी खासगी वाहतूकदारांनी महामंडळ आगारात दिलेली एंट्री एसटी कर्मचाऱ्यांच्या स्वाभिमानावर पाय देणारी ठरली. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची चिन्ह आहेत.
शिवशाही, शिवनेरीच्या ब्रेकवर खासगी ठेकेदारांचा पाय
आता तर राज्य सरकारच्या कृपेने शिवनेरी, शिवशाही बसही खासगी ठेकेदारांच्या हाती गेल्या आहेत. रात्री उशीरापर्यंत ८ बस स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथून सुटल्या. हे आंदोलन मोडीत काढण्याच्या मार्गावर राज्य सरकार दिसत असलं तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध आता फुटला आहे हेही राज्य सरकारनं वेळीच समजून घेतलं तर परिस्थिती नियंत्रणात राहील.