राजकारण

एकनाथ खडसे, उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येऊन गेले. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही आज पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत होते. फडणवीसांनंतर खडसे यांनी पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, उदय सामंत यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. खडसे आणि आपण एकत्र पवारांना भेटण्यासाठी गेलो नव्हतो. शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण गेलो होतो. त्याचबरोबर एशियाटिक लायब्ररी आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयासंर्भात काही सूचना मला करण्यात आल्या होत्या. त्याबाबत माहिती देण्यासाठी आपण पवारांची भेट घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं. त्याचबरोबर आपण पोहोचलो त्यावेळी खडसेही आले. जी चर्चा झाली ती त्यांच्या प्रकृतीसंदर्भात आणि त्यांनी मला दिलेल्या कामाबाबत झाल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.

शरद पवार यांच्यावर नुकत्याच ३ शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यानंतर पवार पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पवारांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा राबता पाहायला मिळतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नुकतीच पवारांची भेट घेतली. या भेटीवरुन राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्याबाबत स्वत: फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण देत ही सदिच्छा भेट होती असं सांगितलं. त्यानंतर आता एकनाथ खडसे आणि उदय सामंत यांनीही पवारांची भेट घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button