सत्ता गेल्यापासून फडणवीस अस्वस्थ; खडसेंची टीका
मुंबई : देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काढला.
खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. महाविकास आघाडी सरकार जन्माला आल्यापासून हे सरकार पडणार असल्याचं चंद्रकांत पाटील सांगत आहेत. चंद्रकांतदादांनी सरकार पडणार असल्याच्या दोन तारखाही दिल्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. पण काही होत नाही. सरकार काही जात नाही. विरोधक वाट बघत आहेत. ते वाटच बघत राहतील, असा टोला खडसे यांनी लगावला. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसेंदिवस मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
अजितदादांसोबत सत्ता स्थापन करणे ही चूक होती असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावरूनही खडसेंनी त्यांच्यावर टीका केली. फडणवीस अस्वस्थ आहेत. कोणत्याही कारणाने सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं. आता त्यांनी चूक मान्य केली आहे. पण चूक मान्य केल्यानंतरही अजूनही असा प्रसंग आला किंवा एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा टोला त्यांनी लगावला.