मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्विटमुळे उपस्थित होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची आजच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. यासर्व गोष्टींवर पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे.
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, ‘शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू. जय महाराष्ट्र.’
शाब्बास!
जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.
chronology कृपया समज लिजीये.
कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) August 29, 2021
येत्या मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.
पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा : किरीट सोमय्या
मी गेल्या चार महिन्यांपासून याबद्दल बोलत आहे. त्यामुळे रत्नागिरीची मुद्दा पुढे करुन घोटाळेबाजांना पाठिशी घालू नका, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना उद्देशून म्हटलं. अनिल देशमुख, आता अनिल परब आणि पुढचा नंबर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांचा असेल, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. अनिल परब यांनी किती माया गोळा हे संजय राऊतांनी अनिल परब यांना विचारावे. आरटीओ ट्रान्सफरपासून इतर गोष्टीतून अनेक पैसे वापरले असं अनिल परब यांनी कबूल केलं असा आरोप किरीट सोमया यांनी केला आहे.