राजकारण

उत्तर प्रदेशची आगामी विधानसभा योगींच्याच नेतृत्वात लढण्याचा भाजपचा निर्णय

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणारी विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात लढली जाईल. उत्तर प्रदेशात आता मंत्रिमंडळाचा विस्तार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी भाजपची महत्त्वाची बैठक झाली. यात पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस आणि महामंत्री बी. एल संतोष आणि अरुण सिंह हे उपस्थित होते. त्यावेळी हा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आमदारांचे रिपोर्ट कार्ड पाहून कामगिरीच्या आधारावरच निवडणुकीची उमेदवारी दिला जाईल, असं बैठकीशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि गंगा नदीत वाहत्या मृतदेहांच्या वृत्तांनंतर योगी सरकारवर जोरदार टीका केली जात होती. यानंतर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या. यात उत्तर प्रदेशातील सरकारच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली गेली. तसंच राज्य सरकारची प्रतीमा सुधारण्यासाठी काय करता येईल? याची योजनाही आखली गेली. यामुळे राज्य मंत्रिमंडळात फेरबदल आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. अनेक जुन्या मंत्र्यांना बाहेर करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असं बोललं जातं होतं.

उत्तर प्रदेशात काही दिवसांपासून बैठका सुरू आहेत. यात कॅबिनेटमधील बदलांसह निवडणूक प्रचारावरही चर्चा सुरू आहे. अलिकडेच पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सरचिटणीसांची दोन दिवस बैठक घेतली. यात उत्तर प्रदेशसह ५ राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीवर चर्चा केली गेली. यात बी. एल संतोष आणि उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी राधा मोहन सिंह हे ही उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button