मुंबई : पनामा पेपर्स लीक प्रकरणी ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावण्यात आले होते. तिला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते, यानंतर ऐश्वर्या चौकशीत सहभागी होण्यासाठी ईडीच्या दिल्ली कार्यालयात पोहोचली. येथे ऐश्वर्याची साडेपाच तास चौकशी करण्यात आली. याप्रकरणी ईडीने अभिषेक बच्चनलाही समन्स बजावले होते.
ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वीही दोन वेळा बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळा तिने नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती.
फेमाप्रकरणी ईडीने ऐश्वर्याला समन्स बजावले होते. हे समन्स ९ नोव्हेंबर रोजी ‘प्रतिक्षा’ म्हणजेच बच्चन कुटुंबीयांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. यावर १५ दिवसांत उत्तर मागितले होते. ऐश्वर्याने ईमेलद्वारे ईडीला उत्तरही दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये ईडी, आयकर विभाग आणि इतर एजन्सींचाही समावेश आहे.
पनामा पेपर्स लीक प्रकरणात एका कंपनीचे लिगल दस्तऐवज लीक झाले होते. हा डेटा जर्मन वृत्तपत्र Suddeutsche Zeitung (SZ) ने ३ एप्रिल २०१६ रोजी पनामा पेपर्स या नावाने प्रसिद्ध केला होता. यात भारतासह २०० देशांतील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटींची नावे होती आणि त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप होता. यात १९७७ ते २०१५ अखेरपर्यंतची माहिती देण्यात आली होती. या यादीत ३०० भारतीयांची नावे होती. यात ऐश्वर्याशिवाय अमिताभ बच्चन, अजय देवगण तसेच पळपुट्या विजय माल्याच्या नावाचाही समावेश होता.