अनिल देशमुख प्रकरणात ‘ईडी’कडून अॅड. जयश्री पाटील यांचा जबाब

मुंबई: अनिल देशमुख प्रकरणी ईडीने आज अॅड. जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवला आहे. सुमारे चार तास जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी त्यांनी ईडीला अनेक पुरावे दिले आहेत. तसेच ईडीच्या सर्व प्रश्नांचीही उत्तरे दिल्याचा दावा जयश्री पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पाटील यांनी ईडीला नेमके कोणते पुरावे दिले? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या प्रकरणी जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
याप्रकरणी आज ईडीने जयश्री पाटील यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार पाटील या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात आल्या. यावेळी सुमारे चार तास त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. मला ईडीने प्रश्न उत्तर स्वरुपात माहिती विचारली. ईडीच्या सर्व प्रश्नांना मी उत्तरे दिली आहेत. त्यांना अनेक पुरावे दिले आहेत. ज्या लोकांकडून पैसे गोळा केले जात होते, त्यांची माहिती दिली आहे, असं पाटील म्हणाल्या. आज चार तास माझा जबाब नोंदवण्यात आला. परंतु, माझा जबाब आज पूर्ण झालेला नाही. मला पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं जाणार आहे. जेव्हा बोलावलं जाईल, तेव्हा मी पुन्हा ईडीच्या कार्यालयात जाऊन ईडीला सहकार्य करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.




