राजकारण

ठाण्याचा पोलीस आयुक्तपदी जयजित सिंह

विनित अग्रवाल महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख

मुंबई : ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या बढतीनंतर गेले तीन आठवडे रिक्त असलेल्या पोलीस आयुक्तपदी अखेर भारतीय पोलीस सेवेतील विद्यमान एटीएस प्रमुख जयजीत सिंह यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. जयजित सिंह यांच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अखेर समन्वय घडून आल्यामुळे त्यांच्या ठाणे पोलीस आयुक्त पदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे. १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले जयजित सिंह यांच्या नियुक्तीचे पत्र सोमवारी निघाले.

जयजित सिंग हे भारतीय पोलीस सेवेच्या १९९० च्या बॅचचे आयपीएस आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जय जीत सिंग यांची नियुक्ती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरून महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख पदी करण्यात आली होती. ४ मे रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना महासंचालक पदावर बढती देत त्यांची नियुक्ती महाराष्ट्र पोलिसांच्या गृहनिर्माण मंडळात करण्यात आली. त्यावेळेपासूनच महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख असलेले जयजीत सिंह यांच्या नावाची चर्चा ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी होत होती. तथापि जयजित सिंह यांच्या नावाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये एकवाक्यता होत नव्हती. जयजित यांच्या प्रमाणेच ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी १९८९ च्या बॅचचे संजय कुमार आणि राजेंद्र सिंह यांच्या नावाचीही शिफारस होती. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि ठाण्याचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जयजीत सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

ठाकरे सरकार मधील खातेवाटपात गृहखाते राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळे या खात्यातील नियुक्त्या, बदल्या या राष्ट्रवादी मार्फतच करण्यात याव्यात असा राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांचा आग्रह होता. तर दुसरीकडे शिवसेनेतील वजनदार मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशी विचारात घेऊन गृह खात्यातील नियुक्‍त्या तसेच बदल्या करण्यात याव्यात याबाबत शिवसेना आग्रही होती.

विनित अग्रवाल महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख

सोमवारी तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची ऑर्डर निघाली. त्यामध्ये जयजीत सिंह, संजय सक्सेना आणि विनीत अग्रवाल या तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत. विनीत अग्रवाल हे नवीन एटीएस प्रमुख झाले आहेत, तर संजय सक्सेना यांची बदली विनीत अग्रवाल यांच्या जागी करण्यात आली आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी जयजित सिंह यांची नियुक्ती झाल्यामुळे राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी आता विनित अग्रवाल यांची नेमणूक करण्यात आली आहे. विनित अग्रवाल हे १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. संजय सक्सेना यांच्याकडे पोलीस महासंचालक विशेष अभियान ही राज्याची जबाबदारी होती, त्यांना आता प्रधान सचिव (विशेष) गृह विभाग, मंत्रालय येथे नियुक्ती देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button