Top Newsराजकारण

फडणवीसांच्या काळात मुनगंटीवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना हाकलून दिले होते; राऊतांचा भाजपवर पलटवार

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत सरकारला सहानुभूती आहे. शिवसेना कामगार क्षेत्रातून जन्माला आली आहे. शिवसेना कष्टकऱ्यांचे नेतृत्व करते. एसटी कर्मचारी आज ज्या मागण्या करत आहेत, त्या मागण्या घेऊन फडणवीस मुख्यमंत्री असताना मुनगंटीवार यांच्याकडे गेल्यावर त्यांना हाकलून देण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. भाजप एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवत आहेत. आम्हाला कामगारांचे प्रश्न कुणी शिकवण्याची गरज नाही. कर्मचाऱ्यांनी भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहनही राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे.

एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासह प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, सदाभाऊ खोत यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर पलटवार केला.

भाजपनं मशीन तयार केलीय. त्यात सगळे स्वच्छ होतात, अशी त्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे. साधू-संतांचे राजकारण राहिलं नाही. निवडणूक जिंकण्यासाठी राजकारण वेगळ्या थराला गेलं आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज प्रमुख माणसाने लक्ष घातलं पाहिजे. राज्याची आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.

संवेदनशीलतेनं संपाकडे पाहा, फडणवीसांचं आवाहन

‘एसटी संपाबाबत सरकारची भूमिका असंवेदनशील. संप चिघळू नये असं आम्हाला वाटतं पण सरकार दमनशाहीचा वापर करत आहे. हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न होत असेल तर ते अजून वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. कर्मचाऱ्यांना दिलासा द्यायला हवा. राज्य सरकारनं तात्काळ चर्चा करुन यावर तोगडा काढायला हवा. आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार. आमचे आमदार गोपीचंद पडळकर, इतर सर्व आमदार, सदाभाऊ खोत आंदोलनात आहेत. सरकारनं संवेदनशीलता दाखवावी’, असं आवाहन फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button