आरोग्यराजकारण

महाराष्ट्रात कोरोना स्थिती गंभीर, आता राजकारण नाही : प्रकाश जावडेकर

पुणे: आपण गंभीर कोरोना परिस्थितीचा सामना करतो आहोत. ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नाही. सामान्य जनतेच्या हितापेक्षा काही महत्त्वाचे नाही. त्यामुळे यावर आपण राजकारण करणार नाही, असे केंद्रीय पर्यावरण व माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज स्पष्ट केले.

कौन्सिल हॉल येथे झालेल्या पुणे जिल्हा करोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘राज्यातील परिस्थितीबाबत मी केंद्रीय मंत्री व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. महाराष्ट्राला प्रामुख्याने व्हेंटिलेटर्सची गरज आहे. येत्या तीन ते चार दिवसांत महाराष्ट्राला ११२१ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत केंद्र सरकार आवश्यक मनुष्यबळासाठी अर्थसाह्य करेल. त्यावर ७०० व्हेंटिलेटर गुजरातहून तर ४२१ आंध्र प्रदेशातून येत्या तीन ते चार दिवसात उपलब्ध होतील. राऊरकेला तसेच अन्य ठिकाणाहून ऑक्सिजनही मागविण्यात येईल. महाराष्ट्राला लशींचा पुरेसा पुरवठा झाला आहे. त्याचे नीट वितरण झाल्यास लसीकरणातील अडथळे दूर होतील, असे जावडेकर म्हणाले.

‘करोनाची साखळी तोडण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायोजनांचे पालन नागरिकांनी केले पाहिजे. शुक्रवारपासून लागू झालेल्या लॉकडाऊनला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. यापुढे टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रेसिंग व ट्रीटमेंटसाठी आवश्यक मनुष्यबळासाठी केंद्र सरकार नॅशनल हेल्थ मिशनमधून निधी पुरवेल,’ असे जावडेकर म्हणाले. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये केंद्राची ३० पथके परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पुण्यामध्ये माजी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक कार्यरत असून ते आपला अहवाल सादर करतील, असे जावडेकर यांनी सांगितले.

आतापर्यंत महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीनच राज्यांना करोना लशींचे एक कोटीहून डोस मिळाले आहेत. शुक्रवार सायंकाळपर्यंत महाराष्ट्राला एक कोटी सहा लाख डोस मिळाले आहेत. त्यापैकी ९५ लाख प्रत्यक्ष महाराष्ट्र शासनाकडे आले आहेत. तर उर्वरित शनिवारी मिळाले आहेत. त्यापैकी १५ लाख ६३ हजार डोस शिल्लक असल्याची माहिती राज्य शासनानेच दिली आहे. त्यांचे वितरण झाले की लस उपलब्ध नाही, ही समस्या उरणार नाही, असे जावडेकरांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button