आयुर्वेदाचार्य डॉ. पी. के. वॉरिअर यांचे निधन
कोट्टाक्कल : जगभरातील आयुर्वेद औषधे आणि उपचाराला लोकप्रिय करणारे डॉ. पी. के. वॉरिअर (वय १०० वर्षे) यांचे शनिवारी मलप्पुरम जिल्ह्यातील कोट्टाक्कल येथील निवासस्थानी निधन झाले.
डॉ. वॉरियर हे कोटक्कल आर्य वैद्य शाळा या प्रख्यात आयुर्वेद उपचार केंद्र आणि आयुर्वेद औषध उत्पादक यांचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते. ८ जून रोजी त्यांनी आपला १०० वा वाढदिवस साजरा केला. सध्या कोरोनामुळे त्यांनी वैयक्तिक वैद्यकीय सल्ला देणे टाळत होते. डॉ. वॉरिअर हे आर्य वैद्य शाळेचे संस्थापक ‘वैद्यरत्नम’ पीएस वॉरिअर यांचे पुतणे होते. १९९९ मध्ये देशाने त्यांना पद्मश्री आणि २०१० मध्ये पद्मभूषणने सन्मानित केले होते. थलाप्पानाथू श्रीधरन नामबोथीरी आणि कुंजी वरसियार या सहा मुलांमध्ये डॉ. वॉरियर सर्वात लहान होते.
अभियंता होण्याची आकांक्षा असूनही, त्यांनी कौटुंबिक परंपरेचे पालन केले. काका ‘वैद्यरत्नम’ डॉ. पी. एस. वॉरिअर यांच्यासोबत आयुर्वेदाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी आयुर्वेदाच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाचा नारा दिला होता. डॉ. पी के वॉरिअर या चळवळीने प्रेरीत झाले आणि त्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी घर सोडलं. मांजेरी येथील कम्युनिस्ट पक्षात सामील झाले.
डॉ. पी. के. वॉरिअर यांनी आपल्या आयुर्वेदाच्या अभ्यासाची सुरुवात आर्य वैद्य शाळेच्या किचनमध्ये सहायक म्हणून केली. त्यावेळी त्यांना ११२ रुपये दरमहा पगार मिळायचा. या पगारात त्यांचा महागाई भत्ताही समाविष्ट असायचा. अखिल भारतीय आयुर्वेद परिषदेने त्यांच्या ऋषितुल्य कर्तृत्वासाठी १९७७ मध्ये आयुर्वेद महर्षी हा सन्मान देऊन गौरव केला.