माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे करोनाने निधन
नवी दिल्ली : ‘पद्मविभूषण’ सन्मानित देशाचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. कोरोना संक्रमित आढळल्यानंतर सोली सोराबजी यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सोली सोराबजी यांचं पूर्ण नाव सोली जहांगीर सोराबजी असं होतं. त्यांचा जन्म १९३० साली मुंबईत एका पारसी कुटुंबात झाला होता. सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं.
१९५३ सालापासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस सुरू केली होती. ते १९७१ साली सर्वोच्च न्यायालयाचे सीनिअर काऊन्सिल बनले होते. १९७७ – १९८० पर्यंत त्यानी देशाचे सॉलिसिटर म्हणून काम पाहिलं. त्यानंतर देशाचे अॅटर्नी जनरल या पदाची जबाबदारी हाताळण्याची संधी त्यांना दोन वेळेस मिळाली. पहिल्यांदा सोराबजी यांनी १९८९ ते १९९० पर्यंत ‘भारताचे अॅटर्नी जनरल’ म्हणून जबाबदारी हाताळली त्यानंतर पुन्हा एकदा १९९८ ते २००४ पर्यंत त्यांनी या पदाची सूत्रं सांभाळली.
जवळपास सात दशकं सोली सोराबजी कायदेक्षेत्रात कार्यरत राहिले. या दरम्यान त्यांनी मानवाधिकाराची अनेक प्रकरणं हाताळली आणि विजयही मिळवला. मार्च २००२ मध्ये त्यांना मानवाधिकारांचं संरक्षण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू मांडण्यासाठी ‘पद्म विभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
आंतरराष्ट्रीय पातळीवर काम
मार्च २००६ साली ऑस्ट्रेलिया आणि भारता दरम्यान ‘बायलॅटरल लीगल रिलेशन्स’च्या कामासाठी त्यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’चे ‘ऑनररी मेम्बर’ म्हणून निवडण्यात आलं. १९९७ साली ‘युनायटेड नेशन्स’नं त्यांना नायजेरियात मानवाधिकारांच्या स्थितीवर रिपोर्ट तयार करण्यासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. याशिवाय १९९८ – २००४ दरम्यान मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी आणि प्रोत्साहनासाठी तयार करण्यात आलेल्या ‘यूएन – सब कमिशन’चे ते अध्यक्ष राहिले. तसंच २०००-२००६ दरम्यान हेग स्थित ‘परमानंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन’चे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं.