मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अत्यंत खळबळजनक आरोप करत सचिन वाझे प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला. परमबीर सिंग यांनी केलेल्या दाव्यानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. दरम्यान आपल्या आरोपांच्या पुष्टीसाठी सचिन वझे यांचा फोन तपासा असेही त्यांनी म्हटले आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असतानाच परमबीर सिंग यांच्या पत्राच्या सत्यतेबाबतही शंका उपस्थित होत आहे. कारण या पत्राच्या शेवटी परमबीर सिंग यांचे नाव आहे, मात्र त्याखाली सही नसल्याने पत्र खरे की खोटे याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
परमबीर सिंग यांच्या मुंबई पोलिस आयुक्त पदावरून गच्छंतीनंतर ब्लेम गेम सुरू होतानाच त्यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केला आहे. याआधीच अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांच्या कार्यपद्धतीकडे बोट उचलत त्यांची चूक असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले होते. अनिल देशमुख यांना एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात परमबीर सिंग यांची बदली का केली असा सवाल करण्यात आला होता. त्यामुळे परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर पलटवार करत एकच खळबळ उडवून दिली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी गृहमंत्र्यांवर हे आरोप केले आहेत. सचिन वाझेंना बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे वसुल करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनीच दिले होते असाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. मात्र या पत्राखाली सही नसल्याने त्या पत्राच्या सत्यतेबाबत शंका उपस्थित केली जात आहे. एकूणच राजकीय कुरघोड्यांसाठीच हा सगळा प्रकार सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.