पुणे : कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. केंद्राने सुद्धा खबरदारी घेण्यास सांगितले होते. केरळनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. काही लोक रस्त्यावर येऊन राजकारण करत आहेत. नियम पाळले पाहिजेत, अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल. त्यामुळे पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दरडावून सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.
याशिवाय शाळा सुरु करण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. त्यानुसार दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचं काही लोक म्हणतात, तर दुसरा मतप्रवाह आहे तो म्हणजे शून्य टक्के रुग्ण आहे, तिथे शाळा सुरु करा. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील, असंही अजित पवारांनी सांगतिलं.
अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागात लोक कोरोनायचे नियम पाळत नाही म्हणून ही वेळ आली आहे. पुन्हा सर्व बंद पाडण्याची निर्णय घेण्याची वेळ आणू नका. सगळंच बंद करण्याची वेळ आणू नका, असं अजित पवार म्हणाले. काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आहे. केंद्र सरकारनेही सांगितलं आहे, खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी असा सवाल अजित पवारांनी सांगितला.