स्पोर्ट्स

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती क्रिकेट स्पर्धा स्थगित

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत काही दिवसांपासून मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर BCCI नं मोठा निर्णय घेतला आहे. BCCI नं सर्वच वयोगटातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये विनू मंकड ट्रॉफीचाही समावेश आहे. BCCI चे सचिव जय शाह यांनी सर्व राज्यांच्या संघटनांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली असून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्याच्या निर्णयाचीही माहिती दिली. “देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा २०२०-२१ जागतिक महासाथीच्या पार्श्वभूमीवर उशिरानं सुरू झाल्या. महासाथीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला देशांतर्गत स्पर्धा सुरू करण्यासाठी जानेवारी २०२१ पर्यंतची वाट पाहावी लागली,” असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

आपण एजीएममध्ये चर्चा केल्याप्रमाणे आम्ही आयपीएलच्या लिलावापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचं आयोजन करून आमच्या घरगुती हंगामाची सुरुवात केली. यानंतर विजय हजारे ट्रॉफीचं देशाच्या निरनिराळ्या भागांमध्ये यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं. मुंबई आणि उत्तर प्रदेश या संघांमधील सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडिअममध्ये १४ मार्चला आयोजित करण्यात आला होता. महिला संघाच्या सीनिअर टीमचे एकदिवसीय सामने निरनिराळ्या ठिकाणी आयोजित करण्याचीही योजना आहे आणि याचा अंतिम सामना ४ एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. या हंगामात सर्वच वयोगटातील स्पर्धा अधिकाधिक करण्याचा आमचा प्रयत्न होता. परंतु सध्याच्या परिस्थितीकडे पाहता या सर्व स्पर्धा स्थगित कराव्या लागत असल्याचं जय शाह यांनी पत्रात नमूद केलं आहे.

“सध्या या क्रिकेट स्पर्धा खेळवण्यासाठी काही राज्यांमधील परिस्थिती अनुकूल नाही. तसंच येत्या काळात देशात दहावी आणि बारावीच्या परीक्षाही पार पडणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या तरूण खेळाडूंना या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी करणं आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य वेळ मिळायला हवी. आपल्या खेळाडूंचं आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण यांना आमचं प्राधान्य आहेय आयपीएल २०२१ नंतर सर्वच वयोगटातील क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करू,” असं शाह यांनी पत्रात नमूद केलं आहे. आयपीएलच्या १४ व्या हंगामातील सामने ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत खेळवले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button