केंद्राचे सुरक्षारक्षक अदर पुनावालांची रेकी करतात का?; नाना पटोलेंचा केंद्राला सवाल
मुंबई: सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्या सुरक्षेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारला घेरले आहे. पुनावाला यांनी कोणतीही सुरक्षा मागितलेली नसताना त्यांना केंद्राने सुरक्षा दिली. त्यामागे काय दडलं आहे? असा सवाल करतानाच केंद्राने पुरवलेले सुरक्षा रक्षक अदर पुनावाला यांची रेकी करत आहेत काय?, असा गंभीर सवालही नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले. अदर पुनावाला यांनी आधी भारतात जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. त्यांना कुणी धमकी दिली हे केंद्र सरकारने सांगावं. पुनावाला यांनी कुणालाही सुरक्षा मागितली नाही. तरीही त्यांना सुरक्षा का पुरवण्यात आली. या सुरक्षेच्या मागे दडलंय काय? हे केंद्र सरकारने जाहीर करावं, अशी मागणी त्यांनी केली.
पुनावाला यांना केंद्र सरकारने न मागताच सुरक्षा पुरवली आहे. केंद्राचे सुरक्षा रक्षक त्यांची रेकी करत आहेत काय?, असा सवालही त्यांनी केला. तसेच व्हॅक्सिनचे केंद्राने दोन दर ठरवले. यामागे टक्केवारीचं राजकारण काय आहे? असा सवालही त्यांनी केला. केंद्र सरकार लसीकरणात अपयशी ठरल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, पुनावाला यांना देशात कोणीही हात लावणार नाही. त्यांनी देशासाठी आणि देशाच्या जनतेला वाचवण्यासाठी व्हॅक्सिनेशनचं काम भारतात करावं, असं सांगातनाच पुनावाला यांच्यासोबत काँग्रेस असून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी काँग्रेस घेईल, असंही त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीतून तीन पक्ष एकत्र लढत असतानाही दिवंगत आमदार भालक भालके यांच्या मुलाला पराभवचा चव का चाखावी लागली, याची आता चर्चा सुरू झाली आहे. याबाबत नाना पटोले यांनी या पराभवाच्या कारणांवर भाष्य केलं आहे. पंढरपूरमध्ये झालेला पराभव महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पटोले म्हणाले की, पंढरपूर पोटनिवडणुकीचे मुद्दे वेगळे होते. स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक लढली गेली. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्याकडे असणाऱ्या विठ्ठल साखर कारखान्याबाबत लोकांना काही आक्षेप होते. अशा स्थानिक प्रश्नांमुळे आम्हाला अपयश आलं, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिली आहे.
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळांना थेट इशाराच दिला. ‘तुम्ही निर्दोष होऊन बाहेर आलेला नाहीत, जामीनावर आहात…त्यामुळे सांभाळून बोला,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले. या वादावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर बोलण्यापेक्षा केंद्रातील सरकारमध्ये आणि केंद्राचा गृहखात्यात नेमकं काय चाललंय हे पाहावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.