खोट्या तलवारीचे घाव घालू नका; संजय राऊतांचा भाजपला इशारा
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार हलवू शकतो असं केंद्राला वाटत असेल तर ते कदापी शक्य नाही. अशा तपास यंत्रणांचा आघाडी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर घाव घातले पाहिजे. पण खोट्या तलवारीचे घाव घालू नका. विरोधक असले तरी ते महाराष्ट्राचे आहेत. आपण एकमेकांना ओळखतो, त्यामुळे खोटे आरोप करणं बरं नाही, असं संजय राऊत म्हणाले.
राज्यातील विरोधी पक्ष भाजप सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे तपास करण्याची मागणी भाजप करत आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. महाभारतात अर्जुन कुरुक्षेत्राच्या मधोमध लढत होता. अर्जुनाने सर्व बाण परतवून लावले. हे महाभारताचं कथानक आहे. कधीही पांडवांनाच घेरलं जातं. कौरव अधर्माच्या बाजूने होते आणि कौरव हे असत्याचं प्रतिक आहे. सध्या सरकारलाही घेरलं गेलं आहे. श्रीकृष्णाच्या रथाप्रमाणे सध्याचं सरकार कुरुक्षेत्राच्या मध्यभागी आहे. आम्हीही हे बाण परतवून लावू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत. ते अधूनमधून मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. वडीलधारे आहेत. मधल्या काळात ते आजारी होते. त्यामुळे काल भेटले. ते भेटले की चर्चा होते. पण संशयाचे वातावरण नाही. पण आम्ही विरोधकांशी मुकाबला करायचं ठरवलं आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.