बार्ज दुर्घटनेतील मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी ‘डीएनए’ चाचणीची मदत !
मुंबई : तौत्के चक्रीवादळामध्ये समुद्र किनाऱ्यापासून १७५ किमी अंतरावर पी-३०५ बार्ज बुडाले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पटावी म्हणून त्यांच्या मृतदेहाची ‘डीएनए’ टेस्ट होणार आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ६१ झाली आहे. यापैकी ३० मृतदेहांची ओळख पटणे अवघड आहे. त्यामुळे त्यांची ‘डीएनए’ टेस्ट करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे.
आतापर्यंत २८ कर्मचाऱ्यांच्या मृतदेहाची ओळख पटली असून ते त्यांच्या नातेवाईकाकडे देण्यात आले आहेत. कलिना फॉरेन्सिक लॅबच्या मदतीनं उर्वरित मृतदेहांचे ‘डीएनए स्पॅल किट’ तयार करण्यात येतील. त्यानंतर त्याची बेपत्ता कर्मचाऱ्याच्या घरातील व्यक्तींच्या डीएनएशी पडताळणी केली जाईल.
हे बार्ज बुडाल्याच्या प्रकरणात कॅप्टन राकेश बल्लव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्जवरील कर्मचारी मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी यलोगेट पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे. चक्रीवादळाची सूचना असूनही कॅप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज वेळीच न हलवता इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. या अपघातामधील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कॅप्टन बल्लव यांच्या विरोधात सदोष मनुष्यवध तसेच बेजबाबदारपणे वैयक्तिक सुरक्षिततेस धोको पोहोचवणे, गंभीर दुखापतीला जबाबदार असणे आणि विशिष्ट हेतू न ठेवता हत्या करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बार्जवर एकूण २६१ कर्मचारी होते. यापैकी १८८ कर्मचाऱ्यांना नौदलाने वाचवले आहे. आयएनएस कोच्ची या युद्दनौकेच्या सहाय्याने या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले. ताशी १०० किमी वाऱ्याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करुन या सर्वांचा जीव वाचवला आहे.
राज्य सरकारकडून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न? आशिष शेलार यांचा सवाल
बार्ज दुर्घटना प्रकरणी भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही सदर प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचा संदर्भ देत राजीनाम्यांसाठी इतकी घाई का होतेय? असा प्रश्न उपस्थित केला. सोबतच त्यांनी मनातील गंभीर शंका सर्वांसमक्ष मांडली.
प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणत सत्य लपवण्याचाच प्रयत्न केला जात असल्याचं म्हणत त्यांनी मागील काही दिवसांमध्ये झालेल्या घटनांचा पुनरुच्चार केला. मुंबईतील यलो गेट पोलीस स्थानकात बार्ज पी ३०५ प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली. यामध्ये बार्जच्या कॅप्टनच्या नावे गुन्ह्याची नोंद केली गेली. पण, याबाबत भाजपकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी पुढाकार घेत दाखल केलेली एफआयआर म्हणजे खऱ्या गुन्हेगाराला वाचवणे, गुन्ह्याच्या चौकशीची दिशाभूल करणे आणि मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय मिळण्यापासून वंचित ठेवल्याचेच प्रयत्न सुरु आहेत अशा शब्दांत आशिष शेलार यांनी काही बोचरे प्रश्न राज्याच्या गृह खात्यापुढे मांडले.
‘तोक्ते चक्रीवादळाचा इशारा आधीच देण्यात आलेला होता. ११ मे ला नोटीफिकेशन काढत यंत्रणांनी सर्व वेसल, बार्ज परत आले पाहिजे अशा सूचना केल्या होत्या. तरीही अॅफकॉनच्या मालकीच्या बार्जने समुद्रात राहण्याचा निर्णय का घेतला हा आमचा प्रश्न. १० मे रोजी त्यांच्याकडून ओएनजीसीला एक पत्र लिहिण्यात आलं, ज्यामध्ये कामाचं कारण देत परिस्थितीची जबाबदारी घेतल असल्याचं त्यात स्पष्ट केलं गेल्याचा गौप्यस्फोट करत हा कॅप्टन राकेश यांचा एकट्याचाच निर्णय नव्हता’, असं ते म्हणाले.