आमच्या आदर्शांचांच अपमान होत असेल, तर साहित्य संमेलनात जाऊन काय करायचे?; फडणवीसांचा सवाल

नाशिक: मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. मी त्यांना अभिवादनही करतो. पण जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील तर अशा ठिकाणी जाऊन काय करायचे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच.
पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का?
असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2021
साहित्य संमेलनात वीर सावरकरांचा यथोचित सन्मान करण्यात आला नाही. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला शुभेच्छा देताना आणि आपली भूमिका मांडताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis #साहित्यसंमेलन pic.twitter.com/1v8LIEmPuH
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 4, 2021
या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?, असा सवाल करतानाच नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, नाशिकमध्ये असूनही त्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. आता तर त्यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिकमध्ये होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ना त्या कारणाने सतत वादात आहे. सुरुवातीला निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची वादावादी चांगलीच रंगली. संमेलनाच्या तारखांसाठी खोटी कारणे पुढे का केली म्हणत कौतिककराव ठाले-पाटील यांनी जातेगावकरांना पत्र लिहून सुनावले होते. हा वाद शमतो ना शमतो तोच साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नावच टाकले नसल्याचे समोर आले. गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे. संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर, नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक आणि मुंबई येथे १९३८ मध्ये झालेल्या २३ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. नाशिकमधील इतर सर्वच साहित्यिकांचा नावासह उल्लेख होता. मात्र, सावरकरांच्या नावाचा उल्लेख जाणूनबुजून टाळल्याची चर्चा होती. त्यावरून सावकरप्रेमी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. अखेर वाढता रोष पाहता संमेलन गीतामध्ये सावरकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संमेलन गीताच्या एका ओळीत बदल करण्यात आला आहे.
संजय राऊतांचे नेते बदलले
शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली असून काँग्रेसची भलामण करण्यात आली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांचे नेतेच बदलल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे बोलताना केला आहे. तसेच राऊत यांचे तीन नेते कोण यांची नावंही फडणवीसांनी सांगितली आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात सरकारची भूमिका लोकशाही विरोधी!
'मेस्मा'ऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा.
सत्तेच्या अहंकारात इतके मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीही पाहिले नाही.
जनता यांना कधीच माफ करणार नाही!
संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद…https://t.co/auGh8BM2Cy pic.twitter.com/TBhcW0FSN3— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2021
फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना जोरदार कोपरखळ्या लगावल्या आहेत. सामना आणि सामनाच्या संपादकाचे केद्र बिंदू बदलले आहेत. त्यांचे नेते अलिकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी झाले आहेत. मला वाटतं तिच प्रचिती त्यांच्या अग्रलेखातून दिसत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
यावेळी त्यांनी एसटीच्या संपारवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एसटीचा संप मिटावा म्हणून विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहाकार्य केलं. आता सरकारने दोन पावलं पुढे यायला हवं. पण सरकार कामगारांसाठी दोन पावलं पुढं यायला तयार नाही. काल उपोषणकर्त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं कळलं. मला वाटतं सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे. अजूनही वेळ गेली नाही. मेस्मा लागण्याआधी चर्चेतून मार्ग काढा, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.
सत्तेच्या अहंकारात राज्यकर्ते मदमस्त
नायर रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणावरूनही त्यांनी सरकारला फटकारले. या घटना सातत्याने घडत आहेत. पण त्यावर सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. दुर्देवाने नायरमध्ये कोणी बघायलाही गेले नाही. आमच्या नगरसेवक आणि आमदारांनी मुद्दा मांडल्यावर त्यांना जाग आली. सत्तेच्या अहंकारात एवढे मदमस्त झालेले राज्यकर्ते कधीच पाहिले नाही, जनता यांना कधीच माफ करणार नाही, असं फडणवीस म्हणाले.
काँग्रेसला वगळून नवी आघाडी नाहीच!
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला वगळून कोणताही फ्रंट तयार होऊ शकत नसल्याचं आज स्पष्ट केलं. यूपीएचं अस्तित्व नाही ही गोष्ट सत्य आहे. ममता बॅनर्जींच्या म्हणण्यात दमही आहे. पण काँग्रेसला दूर ठेवून कोणताही फ्रंट बनू शकत नाही. काँग्रेसला दूर ठेवून फ्रंट बनवणं योग्य नाही. मध्यप्रदेशात, राजस्थान, हरयाणा, महाराष्ट्र आणि इतर राज्यातही काँग्रेस आहे. काही राज्यात काँग्रेस कमजोर आहे. पण काँग्रेसचं अस्तित्व संपलेलं नाही. काँग्रेसला इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेससोबत मिळून काम केलं तर चांगला फ्रंट तयार होईल, असं राऊत म्हणाले.




