Top Newsराजकारण

आता सुरु झाले राणे-नार्वेकर ‘ट्विटर वॉर’!

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर प्रचंड टीका केली होती. विशेष म्हणजे त्याच प्रकरणावरुन राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला ट्विटरवर इशारा दिला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर शिवसेना सचिव मलिंद नार्वेकरांच्या फोनवरुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा कॉल केला होता, असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला आहे. पण नारायण राणे यांनी त्यापलीकडे फारसं काही बोलण्यास टाळलं आहे. तसेच त्यांनी नार्वेकरांना उद्देशून शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

खरंतर भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे सचिव मलिंद नार्वेकर यांच्यात ट्विटर वॉर सुरु असल्याचं चित्र आहे. राणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मिलिंद नार्वेकर यांचा ‘मातोश्री’मधील ‘बॉय’ असा उल्लेख केला होता. तसेच कोण मिलिंद नार्वेकर? असा सवाल करत खिल्ली उडवली होती. त्यांच्या या टीकेला मिलिंद नार्वेकर यांनी ट्विटरवर उत्तर दिलं होतं. स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? असा खोचक सवाल नार्वेकरांनी केला होता. त्यांच्या या सवालावर नारायण राणेंनी ट्विटरवर प्रत्युत्तर दिलं आहे.

सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू? मला बोलायला लावू नका, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या स्वत:च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नारायण राणे यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. “बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?”, असा सवाल करत नार्वेकरांनीदेखील नारायण राणे यांना टोला लगावला आहे.

मिलींद नार्वेकर तिकीटं विकणारे एजंट – निलेश राणे

मिलींद नार्वेकरांच्या ट्विटला लगेच नारायण राणेंनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले. आता माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत आणि मिलींद नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. विनायक राउत यांचा इतिहास कच्चा आहे.आमच्या विरोधात अशोक चव्हाण चुकीची फिडींग दिल्लीत लावत होते, म्हणून कंटाळून आम्ही काँग्रेस सोडली. अशोक चव्हाण तेव्हा तसे वागले नसते. तर तो निर्णय घेतला नसता, असे निलेश राणे म्हणाले आहेत. तर त्यांनी मिलींद नार्वेकरांना तिकीटं विकणार एजंट आहे म्हणत खिल्ली उडवली आहे.

आमच्यावर कोणती कारवाई होती विनायक राउत यांनी सांगावं, नाहीतर राजकारण सोडावं. ते पुराव्याच्या आधारावर कधी बोलत नाहीत. शिवसेनेत तिकिट वाचवण्यासाठी ते आहेत, अशी टीका राणेंनी केली आहे. नेते पद नव्हत तरी त्यांना राणे साहेबांनी बाळासाहेबांना मुख्यमंत्री केलं ना. विनायक राऊतांना साधे मंत्रीही नाही केलं. राणे साहेबांच काय वजन आहे शिवसेनेत ते २००५ साली आणि त्या आधीच दाखवलं आहे. विनायक राउत यांनी स्वतच वजन बघावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. नारायण राणेंची नेता व्हायची लायकी नव्हती म्हणून बाळासाहेबांनी त्यांना नेतेपद दिलं नाही. संजय राऊतांना बाळासाहेबांनी नेते बनवलं होतं. अशी टीका काही वेळापूर्वीच विनायक राऊत यांनी केली होती. त्यालाच निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मिलींद नार्वेकर यांच्यावरही निलेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर यांना बसायला जागा नसायची.ते मागे उभे असायचे. शिवसेनेत तिकिट विकणारा जर कोण एजंट असेल तर तो मिलिंद नार्वेकर, अशा शब्दात त्यांनी नार्वेकरांचा समाचार घेतला आहे.तसेच नारायण राणे यांनी मिलींद नार्वेकरांना फोन केल्याच्या ट्विटला उत्तर देताना, साहेबांनी फोन केलाही असेल तर काय अडचण आहे का? उद्धव ठाकरे हे काय़ पाकिस्तानचे आहेत का? फोन करण्यात काय चुकलं? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच मेन कलाकार बघून घेतील, हे साईड अ‍ॅक्टरचे काम नाही, असा टोलाही त्यांनी नार्वेकरांना लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button