राजकारण

राणेंच्या रत्नागिरी दौऱ्याच्या दिवशीच जिल्हा नियोजन समितीची बैठक; शिवसेनेची कुरघोडी !

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि नारायण राणे यांचा दौरा एकाच दिवशी आहे. त्यामुळे राणे यांच्या दौऱ्यात एकही अधिकारी नसणार आहे. नारायण राणेंना डिवचण्यासाठी शिवसेनेने ही कुरघोडी केल्याची चर्चा आहे.

सध्या राज्यातील चार केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्र काढत आहेत. पण, या सर्वांमध्ये चर्चेत आणि केंद्र स्थानी असलेली यात्रा म्हणजे नारायण राणे यांची. नारायण राणे थेट शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अर्थात कोकणात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे देखील या यात्रेकडे एका विशेष अर्थानं पाहिलं जात आहे. त्यात आगामी मुंबई पालिका निवडणुकीची जबाबदारी नारायण राणेंना दिल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. या साऱ्या गोष्टी पाहता नारायण राणे यांच्या यात्रेकडे सर्वांचं विशेष लक्ष आहे. नारायण राणे २३ आणि २४ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. यावेळी ते चिपळूण येथे देखील भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याआधी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या निर्णयानं एका वेगळ्याच राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे. २४ ऑगस्ट रोजी राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. नेमके त्याच दिवशी नारायण राणे रत्नागिरी शहरात असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यात एकही अधिकारी हजर राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी राणे चिपळूण येथे आहेत. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी नारायण राणे संगमेश्वर असा दौरा करत रत्नागिरी येथे दाखल होतील. पण, त्याच दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. दरम्यान, यानंतर आता नारायण राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button