सातारा/सांगली : सातारा आणि सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकाल हाती येत असतात धक्क्यांवर धक्के बसल्याचे, निकालानंतर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी फोडल्याचे, राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि काँग्रेस आ. विक्रमसिंह सावंत यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे साताऱ्यात ४ जागांवर दोन उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने चिट्ठी टाकून निर्णय घ्यावा लागला.
आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांचा १ मताने धक्कादायक पराभव झाला आहे. या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवला. ज्ञानदेव रांजणे यांनी जावळीतून ही निवडणूक लढवली आहे. रांजणे हे देखील अजित पवार समर्थक समजले जातात.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावली विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानाच्या दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली होती. यावेळी पोलिसांच्या उपस्थितीतच एकमेकांना अपशब्द वापरणे पर्यंत मजल गेली होती. मोठा अनर्थ व्हायच्या आधीच आमदार शिंदे आणि रांजणे यांनी मध्यस्थी करून समजुतदारपणा दाखवला आणि वाद मिटवला.
जिल्हा बँकेच्या जावळी मतदारसंघासाठी एकूण ४९ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यापैकी शशिकांत शिंदे यांना २४ मतं मिळाली असून २५ मतं घेत रांजणेंनी विजय मिळवला आहे.
या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. पक्षविरहित बँकेची वाटचाल यापुढेही कायम तशीच राहावी, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चर्चा, परस्पर सामंजस्याने निवडणूक टाळण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनांमुळे निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. पहिल्याच टप्प्यात आमदार शिवेंद्रसिंहराजेंसह १० संचालक बिनविरोध निवडून आले.
शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर गोंधळ, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, निवडणुकांपूर्वी दोन दिवस अगोदरही आमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे समर्थक एकमेकांमध्ये भिडले होते.
साताऱ्यात ४ उमेदवारांना मतं सम-समान मते
मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर येत आहेत. त्यात, माण प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातील उमेदवारांना सम-समान मते मिळाल्याने या मतदारसंघात ईश्वर चिठ्ठीला माण मिळाला. त्यामध्ये, शेखर गोरेंना ईश्वरी कौल लाभला. त्यामुळे, विजयानंतर ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
कोरेगाव आणि माण मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना समसमान मतं मिळाली आहेत. त्यामुळे येथे चिठ्ठी टाकून विजय उमेदवाराची घोषणा करण्यात आली कोरेगावमध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना प्रत्येकी पंचेचाळीस मतं मिळाले, येथे एकूण ९० मतदान झाले होते. त्यामध्ये, सुनिल खत्री यांना ईश्वरी चिठ्ठीने कौल दिल्याने खत्री विजयी झाले आहेत. तर, माणमध्ये शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना प्रत्येकी ३६ मतं मिळाली आहेत. त्यामुळे, येथेही विजयी उमेदवार ईश्वर चिठ्ठीद्वारे ठरवण्यात आला. त्यामध्ये, शेखर गोरे नशिबवान ठरले आहेत.
शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का
पाटण विकास सेवा सोसायटी गटात सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले असून त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला.
पाटण विकास सेवा सोसायटी गट-
सत्यजित पाटणकर – ५८
शंभूराजे देसाई – ४४
सत्यजित पाटणकर १४ मतांनी विजयी
कराड सोसायटी गट –
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी, उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव
बाळासाहेब पाटील – ७४
उदयसिंह उंडाळकर पाटील – ६६
बाळासाहेब पाटील ८ मतांनी विजयी
सांगलीत जतमध्ये काँग्रेसला भाजपचा ‘दे धक्का’, आ. विक्रम सावंत पराभूत
सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच फेरीत आलेल्या निकालातून काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांचा पराभव झाला आहे. आमदार सावंत हे जतमधून निवडणूक लढले असून ते मंत्री विश्वजीत कदम यांचे मावसभाऊ आहेत.
मिरजेच्या शेतकरी भवनात सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भाजपच्या पँनेलमधील प्रकाश जमदाडे यांनी सावंत यांचा पराभव केला. आ. सावंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असून सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मावसभाऊ आहेत. त्यामुळे, हा पराभव काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो. दरम्यान, आटपाडीतून शिवसेनेचे तानाजी पाटील विजयी झाले असून माजी आमदार राजेंद्र अण्णा पराभूत झाले आहेत.
तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, वाळवा या सोसायटी गटातील जागा महाआघाडीकडे. अनुक्रमे बी. एस. पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आ. मोहनराव कदम, विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील विजयी.