Top Newsराजकारण

डिस्को, बार, पब ही आरोग्य मंदिरे आहेत का?; आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधून म्हणाले की राज्याला मंदिरांची गरज आहे की आरोग्य मंदिरांची गरज आहे? आरोग्य केंद्र बंद करु आणि मंदिर उघडू का? मंदिर आणि आरोग्य मंदिर या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री असंवेदनशीलता का दाखवतायत हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. राज्यात सुरु असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य मंदिरे आहेत का? असा आमचा सवाल आहे, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. डिस्को, बार, पब बाबत आपण काही बोलणार आहात का याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा या ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का? कारण कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, आरोग्य सुविधा, सँनिटझर वाटप, सँनिटायझेशन या सगळ्या पुरवठा धारकांमध्ये जी काही कट कमिशनची प्रकरण समोर येतायत याच्यावर तुम्ही कधी भाष्य करणार आहात का?, असे काही सवालही त्यांनी यावेळी केले.

पब, रेस्तराँ, डिस्को, बार यांचे मालक यांच्याशी वाटाघाटी होतात आणि वाटाघाटीनंतर ते खुले होतात. कट कमिशन या धोरणाने तुम्ही निर्णय करता का? एक्साईजची कमाई हवी म्हणून दारुची दुकानं उघडी केलीत, मॉल मधल्या कामगारांच कारण सांगून मॉल उघडे केलेत मग या मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धुप, फुल विकणारे यांची उपासमार दिसत नाही? त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिरात किती लोक आले पाहिजेत या बद्दल कोरोनाचे नियम करुन बाहेर नारळ,अगरबत्ती, फुल विकणार्यांच पोट भरु शकत नाही का? यांच्याशी वाटाघाटी होऊ शकत नाही कारण आमचा तो गरीब माणूस या सरकारच्या अपेक्षा काय पूर्ण करणार? म्हणून त्यांना बंदी त्यांच्यावर निर्बंध आणि डिस्को, पब, बार वाले वाटाघाटी करतील, आरोग्य केंद्रात कट कमिशन मिळेल या पद्धतीची भूमिका. आरोग्य केंद्र हवीच पण कट कमिशन नको ही आमची भूमिका आहे. खरतर भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याच काम शिवसेना करतेय. मग गोविंदा असेल, गणेशोत्सव असेल नवरात्र असेल, मंदिर असतील. नियमात राहुन सुरु करु ही भूमिका नाही. भक्तांची देवापासून ताटातूट करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून हा कोरोना बंदीचा कार्यक्रम नाही तर हे देऊळ बंदीचं शिवसेनेच अभियान आहे, असंही शेलार म्हणाले.

ज्या पद्धतीने हे प्रकार चालू आहेत त्यावर मुख्यमंत्री कधी बोलतील का हा प्रश्न आहे. आरोग्य केंद्राच बोलतात तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे इथून जवळच असलेल्या ठाणे जिल्ह्यामधे आदिवासी पाड्यातील ७४१ बालकांचा ६ महिन्यात मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. कुठे आहे आरोग्य व्यवस्था, कुठे आहेत आऱोग्य केंद्र? कुठे आहेत पायाभूत सुविधा. देवालय नको तुम्हाला चालेल, ही तुमची भूमिका असेल, पण देवालय बंद करुन एका अर्थाने राज्यभर शवालय तुम्ही उघडली आहेत. महानगरपालिकेच्या इस्पितळात डोळा कुरतडून खाल्ला म्हणून मृत्यू, सायन ते नायर शवाच्या बाजूला जिवंत माणसांवर उपचार, कोविड सेंटर मधे टॉयलेटमध्ये मृत्यू आणि आता बालकांचा मृत्यू. थोडी तरी संवेदनशीलता मुख्यमंत्री दाखवा. करोना बंदीच्या नावावर देऊळ बंदी करु नका, असंही ते यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button