
राळेगणीद्धी : आमदार निलेश लंके यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरोधातील तक्रारी, त्याअनुषंगाने झालेल्या चौकशीत आढळून आलेले तथ्य यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शनिवारी अवगत केले होते. त्यावेळी असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नको अशी भूमिका अण्णा हजारे यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाचे औचित्य साधून हजारे यांच्याकडे पोहचलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांना ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी चांगलेच झापले आहे.
अण्णा हजारे यांच्याकडे रडत गेलेल्या देवरे यांना उद्देशून हजारे म्हणाले, तुम्ही मला भेटू नका, तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. चौकशीत ते सिध्दही झाले आहेत. चारित्र्य शुध्द ठेवा, अपमान गिळण्याची तयारी ठेवा. पारनेरचे लोकप्रतिनिधी अतिशय चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामामुळे तालुक्याचे नाव जगात पोहचले आहे. त्यांच्यावर आरोप करताना थोडातरी विचार करायला हवा होता. तुमच्या स्वभावात बदल करा असे अण्णा हजारे यांनी तहसीलदार देवरे यांना म्हटलं आहे.
दरम्यान अण्णा हजारे पुढे म्हणाले की, तुमच्या स्वार्थासाठी आमदार निलेश लंके यांच्यासारख्या तरूणाची राजकिय कारकिर्द खराब करू नका. तुमच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने तसा अहवाल दिला आहे. असे सांगत हजारे यांनी तहसीलदार देवरे यांना चांगलेच झापले. मला भेटण्यासाठी येऊ नका असे हजारे सांगत असताना देवरे या अण्णा मला एकदा तरी राखी बांधू द्या अशी विनवणी करीत होत्या.
अण्णा हजारे यांनी झापल्यानंतर देवरे खोलीबाहेर आल्या. हजारे यांच्यासोबत भेट घडवून आणण्यासाठी त्यांनी अनेकांना फोन केले. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने कोणीही देवरे यांची वकिली करण्यास धजावले नाही. अखेर तीन तासानंतर निराश देवरे पारनेरकडे रावाना झाल्या.




