मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक अनेक दिवसांपासून सातत्याने भाजप आणि ईडीच्या कारवायांविरोधात टीका करताना दिसत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत ईडीने किरीट सोमय्या यांना अधिकृत प्रवक्ता केले आहे का, अशी विचारणा केली आहे.
नवाब मलिकांनी आपल्या घरी ईडी किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचे सूचक ट्विट केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. यावर, नवाब मलिकांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आला आहे. म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. नवाब मलिकांनी याला प्रत्युत्तर दिले आहे.
बातम्या पेरण्याचे उद्योग बंद करा
काही दिवसापासून ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना नवाब मलिक यांच्या घरावर छापा पडणार आहे अशा बातम्या पेरण्यात येत आहेत. त्यांनी बातम्या पेरून बदनामीचा उद्योग बंद करावा. काही असेल तर रितसर प्रेस नोट काढा आणि त्या बातम्यांची जबाबदारी स्वीकारा.भाजपच्या अजेंड्यावर आम्हाला बदनाम करण्याचा उद्योग ईडीने बंद करावा, इशारा देतानाच सोमय्या हे नवाब मलिक यांना अटक होणार आहे असे सांगत आहेत. सोमय्या तुम्ही ईडीचे प्रवक्ते झाल्याचे नियुक्ती पत्र घ्या. ईडीलाही एका चांगल्या प्रवक्त्याची गरज आहे. सोमय्यांना निदान पगार तरी सुरु होईल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, नवाब मलिक यांनी, साथियों, सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है. डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, असे ट्विट केले होते.
भाजपच्या पुण्यातील दोन नेत्यांनी वक्फच्या जमिनी हडपल्या
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. सोमय्या तुम्ही मी वक्फ बोर्डाची जमीन हडप केली असे सांगत आहात. मी जमीन हडप केलेली नाही. मात्र आगामी काळात पुण्यातील दोन एफआयआरमध्ये वक्फची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांवर एफआयआर दाखल होणार आहे. त्यांना लवकरच अटक होईलच. मात्र राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीनी भाजप नेत्यांनी लाटल्या आहेत त्यांना सोडणार नाही, असा इशारा देतानाच आता या नेत्याना ईडी बोलावते का हे पाहणार आहे, असे सूचक विधान मलिक यांनी केलं.
सोमय्यांचा बोगस बिलांचा घोटाळा
सोमय्या यांनी खासदार असताना बोगस बिलांद्वारे पैसे उकळले, त्याचीही माहिती मी येणाऱ्या काळात बाहेर काढणार आहे. सोमय्यांना ईडीचा प्रवक्ता घोषित केले पाहिजे. मी दररोज सकाळी दरवाज्यात पुष्पगुच्छ घेऊन ईडीच्या अधिकाऱ्यांची वाट पाहत असतो. यापुढेही आले तर त्यांचे स्वागतच करू. परंतु ज्यापद्धतीने ईडीच्या अधिकाऱ्यांनी वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर सात ठिकाणी छापा मारला अशा बातम्या पेरल्या होत्या. त्याचे उत्तर त्याचदिवशी दिलेले होते, असे मलिक यांनी सांगितलं.
ईडीवर गंभीर आरोप
यावेळी त्यांनी ईडीवर गंभीर आरोप केला. आमच्या एका अधिकाऱ्याला ईडीचे अधिकारी दोन दिवस बोलावून तुम्ही एण्डोमेंट बोर्डाचा चुकीचा एफआयआर दाखल केलात काय गरज होती? अशी विचारणा करत आहेत. माझ्याविरोधात काही सापडत नसल्याचं पाहून एफआयआर चुकीचा आहे असं सांगितलं जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.