खा. नारायण राणेंनी काढले ठाकरे सरकारचे वाभाडे
महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारा अर्थसंकल्प
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर शुक्रवारी सडकून टीका केली. सागरी महामार्ग करणार पण तरतुद नाही, पण पुण्यातील महामार्गाला तरतूद करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पात पुण्याला सर्व काही देण्यात आलं आहे. कारण पुण्यातील व्यक्तीची जास्त चालते. राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त पुण्याभोवती केंद्रीत महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक अर्थसंकल्प आहे. टीव्हीवर सुरू असणाऱ्या जाहिराती बघा, या जाहिराती बघून लोक शिव्या घालत आहेत, असा हल्लाबोल राणेंनी केला. यावेळी त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातील अनेक गोष्टींवर बोट ठेवत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
राणे म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त पुण्याभोवती केंद्रीत महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक अर्थसंकल्प आहे. राज्याच्या उत्पन्नात प्रचंड मोठी तूट आहे. अजूनही कोरोना संपलेला नाही. अजूनही उत्पन्न कमीच येणार असं वाटत असताना अर्थसंकल्पात दावा केला एवढे पैसे कोठून येणार आहेत? दीड लाख कोटी उत्पन्न कमी असताना एवढ्या गोष्टींसाठी पैसे कुठून आणणार? सरकारने फक्त घोषणा केल्यात, एकही तरतूद केलेली नाही. अर्थसंकल्पात सरकारने वायदे दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वायद्याला विचारत कोण? शेतकऱ्यांना काय दिलं? प्रत्यक्षात महावितरणाला एकही रुपये मिळणार नाही मग महाराष्ट्राला सुरळीत महावीतरण होईल का? अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला, दुसऱ्या साहेबांना कळला का सांगावं. त्यांनी नुसती मान हलवत होते, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
अर्थमंत्र्यांनी हे बजेट फोडले आहे. कोकणाच्या कोणत्या योजनेला पैसा दिला? कोकणाला काहीच दिलं नाही. आमच्या इकडे चक्रीवादळाला एक रूपयाही आला नाही. टिव्हीवर सुरू असणाऱ्या जाहिराती बघा, या जाहिराती बघून लोक शिव्या घालत आहेत. त्यांनी तीन महिने दिलेत, पण मी तर म्हणतो की हे सरकार एकही दिवस राहू नये, असंही राणे म्हणाले.
नारायण राणे यांनी अर्थसंकल्पाची अगदी चिरफाड केली. ते म्हणाले, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असेल तर हा बोगस अर्थसंकल्प आहे. तरतुदी या ग्रीनबुकमध्ये असतात, पण यावेळी ना ग्रीनबुक दिलं, ना व्हाईट बुक दिलं. तरतूदच केली नाही, तर पैसे आणणार कुठून? मुख्यमंत्री प्रेस घेतात आणि सांगतात आम्ही हे देतो ते देतो. अरे बांधून दाखव ना एक कायतरी असं. कोकणात फक्त घोषणांचा पाऊस पाडलाय. एकाही योजनासाठी आर्थिक तरतूद नाही. केवळ पुणे आणि आजुबाजूच्या परिसरासाठी व्यवस्थित तरतुदी करण्यात आल्यात.
केंद्र आणि मुंबई महापालिकेच्या अनेक योजनांचा उल्लेख अर्थसंकल्पात केलाय. हे करता येतं का? याचे पैसे तुम्ही देणार आहेत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. कोव्हीडबद्दल बोलत आहेत, पण देशातील सर्वाधिक कोरोना हॅाटस्पॅाट हे महाराष्ट्रात आहेत. देशातल्या 10 जिल्ह्यांमधील 8 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात पुन्हा लॅाकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री बोलत आहेत. देशातील रूग्णांच्या तुलनेत 60 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.
तहसीलदार म्हणून नियुक्ती, पण अजूनही शेतमजूर
नारायण राणे म्हणाले, MPSC चा सावळा गोंधळ सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी तारीख जाहीर केली. मात्र, एका विद्यार्थ्यांनं ट्विट केलं की 10 महिने झाले तहसिलदार म्हणून नियुक्ती झालीय, पण अजूनही शेतमजूर म्हणून काम करतोय. ही आमची अवस्था आहे. करून दाखवलं, काय तर सरकारनं हे काम केलंय. कायदा व सुव्यवस्था इतकी बिघडली आहे की घरातून निघालेली व्यक्ती परत येण्याचा विश्वास नाही. सुशांत सिंग, दिशा सालिअन, पूजा चव्हाण, हिरेन मनसुख काय सुरू आहे राज्यात? काही मंत्र्यांच्या आशीर्वादाने डान्स बार आणि पब चालू आहेत, असा टोला आदित्य ठाकरेंचं नाव न घेता लगावला. अर्थसंकल्पात सगळं बोगस आहे कसे येणार उत्पन्न सांगा तरी, असा सवाल राणेंनी केला.
मंत्रिपदासाठी पैसे दिलेत…
अंबानींसारख्या उद्योगपतीला धमक्या दिल्या जातात, सुपारी दिली जाते आणि त्याच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी सापडते. एक पोलीस अधिकाऱ्याची बाजू मुख्यमंत्री घेतात. सचिन वाझेची मुख्यमंत्र्यांना भरपूर काळजी आहे. याच्याशिवाय आपलं संरक्षण कोण करणार नाही असंच त्यांना वाटतंय. दिशा सालिअनवर बलात्कार झाला, हत्या झाली, तरी कोणाला काही करत नाहीत. राठोड कसा राजीनामा देईल? त्यानं मंत्रिपदासाठी पैसे दिलेत. ते पैसे वसूल झाल्याशिवाय कसं होईल? एक मंत्री फरार कसा काय असू शकतो? मंत्र्याच्या संरक्षणासाठी पोलीस सोबत असतात, असंही त्यांनी नमूद केलं.