आरोग्य

मधुमेहींना हृदय विकाराचा धोका अधिक: तज्ज्ञांचे मत

मधुमेहींची संख्या सुमारे ७७ दशलक्षांच्या घरात असलेल्या भारताला मधुमेहाची जागतिक राजधानी असे म्हटले जाते. अधिक चिंतेची बाब म्हणजे मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या शरीरातील ग्लुकोजच्या वाढलेल्या पातळीमुळे रक्तवाहिन्या आणि हृदयाचे कार्य नियंत्रित करणा-या नसांना हानी पाहोचू शकते व त्यामुळे अशा व्यक्तींना कार्डिओव्हॅस्क्युलर आजार जडण्याचा धोका अधिक असतो. कार्डिओव्हॅस्क्युलर आजार हे मधुमेहग्रस्त रुग्णांमधील मृत्यूच्या काही प्रमुख कारणांपैकी एक आहे असे पाहण्यांमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलर आजार (सीव्‍हीडी) आणि विशेषत: हृदय निकामी होणे अर्थात हार्ट फेल्युअरच्या रुग्णांसाठी मधुमेहाने प्रभावी व्यवस्थापन अधिकच महत्त्वाचे ठरते.

सर्व कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांपैकी हार्ट फेल्युअर हे रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे आणि वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज भासणारे प्रमुख कारण आहे. बरेचदा या आजाराचे रुग्ण या आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर कार्डिओलॉजिस्टकडे जातात व तोपर्यंत त्यांच्या हृदयाला ब-यापैकी हानी पोहोचलेली असते असेही तज्ज्ञांना दिसून आले आहे. मधुमेहग्रस्त रुग्ण वेळच्यावेळी उपचार घेताना दिसतात, मात्र हार्ट फेल्युअरच्या रुग्णांकडून उपचारांचे असे नियमित पालन केले जात नाही. एकूण लक्षणांमध्ये थोडी सुधारणा दिसून आली की, उपचार थांबवण्याकडे त्यांचा कल दिसतो.

तुम्हाला माहीत आहे का ?

– टाइप-२ डायबेटिस असलेल्या लोकांना कन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअरची समस्या निर्माण होण्याची शक्यता मधुमेह नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अडीचपटींनी जास्त असते.
– टाइप-२ डायबेटिस आणि हार्ट फेल्युअर असलेल्या दर चारपैकी १ व्यक्ती १८ महिन्यांहून अधिक काळ जिवंत राहू शकत नाही.

प्रत्यक्षात, लवकरात लवकर निदान आणि वेळच्यावेळी उपचार हार्ट फेल्युअर व मधुमेह या दोन्हींच्या प्रभावी व्यवस्थापनाचा मूलमंत्र आहे. यामुळे सीव्‍हीडी आणि अशाप्रकारच्या आनुषंगिक आजारांच्या वाढत्या संख्येस अटकाव करता येईल व त्यापायी उद्भवणारा हॉस्पिटलायझेशन, मृत्यू वा अपंगत्वाचा धोकाही कमी होईल.

मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या कार्डिअ‍ॅक सायन्सेस विभागाचे संचालक डॉ. जमशेद दलाल यांच्या मते, “मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या दुर्धर आरोग्य समस्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे हार्ट फेल्युअरच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. निदानाला होणारा विलंब आणि चालू औषधोपचारांचे नियमित पालन करण्यात होणारी टाळाटाळ ही हार्ट फेल्युअरच्या रुग्णांना वारंवार हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागण्यामागची दोन प्रमुख कारणे आहेत. या रुग्णांपैकी जवळ-जवळ एक तृतियांश रुग्णांना आधीपासून अनियंत्रित मधुमेह असतो. यामुळे बरेचदा आजार खूप बळावल्यावर रुग्ण डॉक्टरकडे येतात व त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासते. हार्ट फेल्युअरसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होणा-या अनेक रुग्णांपैकी जवळ-जवळ ५० टक्के रुग्णांचा आजार हा गंभीर पातळीवर पोहोचल्याचे आम्हाला दिसून येते. म्हणूनच रुग्णांनी आणि त्यांच्या प्रियजनांनी हार्ट फेल्युअरची कोणतीही लक्षणे नजरंदाज न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण योग्य तपासण्यांद्वारे हार्ट फेल्युअरचे वेळेवर निदान होऊ शकते आणि सुरुवातीच्याच टप्प्यावर त्यावर प्रभावी उपचार करता येतात. हार्ट फेल्युअरच्या बहुतांश रुग्णांच्या आजाराचे निदान हे पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतरच होते, म्हणजे आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यावर उपचार सुरू करण्याची संधी त्यांच्या हातून निसटून गेलेली असते. त्याचबरोबर या आजाराचा धोका वाढविणा-या मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि कोरोनरी आर्टरी डिझिज यांसारख्या समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत अन्यथा आपल्या देशावरील हार्ट फेल्युअरचा अभूतपूर्व भार उचलावा लागेल.”

घोटे, पाय आणि पोटाला सूज येणे, सतत थकवा आणि श्रमल्यासारखे वाटणे; धाप लागणे; आणि झोपताना श्वासोच्छवास नीट होण्यासाठी पायाखाली उशा घेण्याची गरज भासणे ही या आजाराची काही सर्वसाधारण लक्षणे आहेत. मधुमेहाच्या रुग्णांनी या लक्षणांची इतर आजारांशी गल्लत करू नये किंवा त्यांकडे दुर्लक्ष करू नये कारण त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

मधुमहे असलेल्या हार्ट फेल्युअरच्या रुग्णांना मधुमेह नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिकवेळा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते.[2] गतकाळातील चिकित्सात्मक निरीक्षणांतून असे आढळून आले आहे की, मधुमेहावरील उपचारांमुळे हृदयविकारांची लक्षणे झाकली जातात.

मधुमेह आणि हार्ट फेल्युअर या दोहोंवरील उपचारांना निरोगी जीवनशैली आणि आहारातील समर्पक बदलांची जोड देणेही आवश्यक आहे. म्हणूनच डॉक्टरांना भेट देताना रुग्णांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात:

आपली लक्षणे आणि उपचारांची प्रगती यांचा नोंद ठेवणे आणि पुढील भेटीमध्ये डॉक्टरांशी त्याबाबत चर्चा करणे.
आपल्या वजनावर लक्ष ठेवणे. शरीरात द्रव साठून राहिल्याने वजनात चढउतार होऊ शकतात. त्याची नोंद ठेवल्यास डॉक्टरांना त्यानुसार तुमच्या उपचारांमध्ये आवश्यक ते बदल करता येतील.
नियमित व्यायाम, समतोल आहार घेणे, मीठ आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान कमी करणे अशा सवयी लावून घेतल्याने या स्थितीचे परिणामकारक आणि सर्व बाजूंनी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button