राजकारण

‘तौत्के’चा तडाखा बसलेल्या कोकणात फडणवीसांचा २ दिवसांचा दौरा

मुंबई : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात आणि संपूर्ण जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळानं मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस २ दिवसांचा दौरा करणार आहेत. उद्या आणि परवा असा २ दिवस फडणवीसांचा पाहणी दौरा असणार आहे. उद्या (बुधवारी) ते रायगड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करतील. तर परवा (गुरुवारी) रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीही येत्या दोन दिवसांत नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केली आहे. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तेव्हाही फडणवीसांनी कोकण दौरा करत नुकसानाची पाहणी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकणाचा दौरा केला होता. तेव्हा ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र, ‘गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि तीही मिळाली नाही. तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवे!, असं ट्वीट करत फडणवीस यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्तांच्या मदतीची मागणी केलीय.

तौत्के चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग, मुख्य रस्ते आणि रेल्वे सेवा बंद आहे. वादळामुळे जवळपास ८० टक्के विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज सेवा खंडीत झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोबाईल टॉवरही कोसळले आहेत. त्यामुळे मोबाईल सेवाही विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी प्रशासनाने आधीच खबरदारी घेत कोरोना रुग्णांसाठी योग्य उपाययोजना केल्याचं दिसून आलं आहे. चक्रीवादळाचा इशारा आधीच मिळाल्यामुळे प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी योग्य ती खबरदारी घेतली होती. वीज गेली तर कोरोना रुग्णांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी कोविड रुग्णालयांमध्ये जनरेटरची सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे वादळाच्या तडाख्यात बत्ती गुल झाली असली तरी कोरोना रुग्णालयातील वीज सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button