राजकारण

महाराष्ट्रात भाजपला पक्षविस्ताराची मोठी संधी : देवेंद्र फडणवीस

कृपाशंकर सिंह यांचा भाजप प्रवेश

मुंबई : २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपाला निवडणूक जिंकूनही विरोधी पक्षात बसावे लागले होते. तेव्हापासून राज्यातील सत्तेत पुन्हा येण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. मात्र वेळोवेळी भाजपाचे मनसुबे उधळले जात आहेत. तरीही राज्यातील सत्तांतरासाठी आणि पक्षविस्तारासाठी भाजपा ने आशावादी आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला राज्यात असलेल्या पक्षविस्ताराच्या संधीबाबत मोठे विधान केले आहे.

मुंबईत आज झालेल्या कृपाशंकर सिंह यांच्या भाजपामधील प्रवेशावेळी उपस्थितांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक लोक भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राज्यात सत्तेवर असलेले तीन पक्षांचे सरकार हे भाजपासाठी राज्यात पक्षविस्तार करण्याची संधी आहे. भाजपासाठी महाराष्ट्राच्या इतिहासातील पक्षविस्तार करण्याची ही मोठी संधी आहे. जिथे जिथे भाजपाविरोधात सर्व पक्ष एकत्र आले आहेत, तिथे तिथे भाजपाचा विस्तार होतो. असे विविध राज्यांमधून दिसून आले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आमच्यासाठी राजकारण म्हणजे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा एक मार्ग आहे. आताच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. मात्र तो प्रश्न आम्ही लावून धरला. भाजपा हा राजकीय स्पेस व्यापणारा पक्ष आहे आणि महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आल्याने अशी स्पेस निर्माण झालेली आहे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या कृपाशंकर सिंह यांचेही देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. कृपाशंकर सिंह यांचा पक्षप्रवेश म्हणजे एक विचारसरणी सोडून दुसऱ्या विचारसरणीमधील प्रवेश आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले. मात्र कलम ३७० च्या मुद्द्यावरून त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना जागृत झाली. अखेर आज त्यांनी राष्ट्रवादाचा विचार करून भाजपामध्ये प्रवेश केला, अशा शब्दांत त्यांनी कृपाशंकर सिंह यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button