मुंबई : समीर वानखेडे प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने एनसीबीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. तर आता मलिकांची कन्या नीलोफर मलिक खान यांनी खुलं पत्र लिहिलं आहे. जानेवारीत एनसीबीनं त्यांचे पती समीर खान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांला जी वागणूक मिळाली ती अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचं नीलोफरनं म्हटलं आहे. समीर खानला १३ जानेवारीला अटक करण्यात आली होती. समीरकडे १९४.६ ग्रॅम गांजा सापडला होता. समीर खानसह अन्य ५ जणांना यात आरोपी बनवलं होतं.
नीलोफरनं याबाबत पत्र लिहित ‘फ्रॉम इ वाइफ ऑफ एन इनोसेंटर द बिगनिंग’ असं कॅप्शन दिलं आहे. या पत्रात नीलोफर मलिक खान त्या रात्रीची घटना सांगतात जेव्हा एनसीबीनं समीर खानला अटक केली होती. त्या संकटाचा सामना कुटुंब आजही करत असल्याचं नीलोफरनं सांगितलं. या पत्रात त्या म्हणतात की, मला आठवतं १२ जानेवारीला समीरच्या आईचा फोन आला होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी समीरला एनसीबीनं बोलावल्याचं म्हटलं. रस्त्यात मी, समीर दोघं एनसीबी कार्यालयात पोहचलो तेव्हा बराच मीडिया आमची वाट पाहत होता. मी त्रस्त झाल्याने माझा हात खिडकीच्या काचेवर मारला. तो माझ्या पायावर पडला. ज्यामुळे माझ्या पायाला २५० टाके टाकावे लागले. ते १५ तास मला आणि माझ्या मुलांना खूप चिंतेत टाकणारे होते.
नवाब मलिकांच्या मुलीचा आरोप आहे की, समीरच्या अटकेपाठी आणखी काहीतरी आहे. कुठलाही ठोस पुरावा नसताना समीरला अटक करण्यात आली होती. आम्हाला खूप वेदना झाल्या. समीरच्या वैयक्तिक आयुष्यात खूप सहन करावं लागलं. पुराव्याशिवाय माझ्या पतीला जेलमध्ये राहावं लागलं. दुसऱ्यादिवशी मला सिक्युरिटी गार्डचा फोन आला तेव्हा त्याने एनसीबी अधिकारी आल्याचं म्हटलं. त्यांनी माझ्या घरात आणि कार्यालयात शोध मोहिम सुरु केली. जोपर्यंत मी कार्यालयात पोहचणार तोवर सामान सगळीकडे पसरलेले पाहायला मिळालं. इतकं शोधूनही माझ्याविरोधात काही मिळालं नाही. आमच्या कुटुंबाला बहिष्कृत केले. पेडलरची पत्नी, ड्रग्स तस्कर अशा शब्दांचा प्रयोग झाला. आमच्या मुलांनीही मित्र गमावले अशी खंत नीलोफरने खुल्या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.