स्पोर्ट्स

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार गोलंदाज आर. अश्विनची आयपीएलमधून माघार

नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत आहे. त्यामुळे देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. तर दुसरीकडे रुग्णालयेही रूग्णांनी खचाखच भरली आहेत. बहुतांशी राज्यात लॉकडाऊनही लादण्यात आलं आहे. या सर्वाचा परिणाम सध्या आयपीएलवरही होताना दिसत आहे. दरम्यान, कुटुंबातील लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने दिल्ली कॅपिटलचा स्टार गोलंदाज आर. अश्विनने आयपीएलच्या १४ व्या मोसमातून माघार घेतली आहे. त्याने ट्विट करून याबाबतची माहिती दिली असून आपल्या कुटुंबातील काही जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहितीही त्याने यावेळी दिली आहे.

अश्विनने ट्विटमध्ये म्हटलं की, मी मंगळवारपासून चालू आयपीएलमधून माघार घेत आहे. माझं कुटुंब सध्या कोविड १९ विषाणूशी झगडा करत आहे. त्यामुळे या कठीण काळात मला त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. जर गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मी पुन्हा आयपीएल खेळण्याची आशा आहे.

काल सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सुपर ओव्हर सामना जिंकल्यानंतर अश्विननं हे ट्विट केलं आहे. दिल्ली कॅपिटल्सची पुढची लढत २७ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. त्यासामन्यात आर अश्विनविना दिल्लीला मैदानात उतरावं लागणार आहे. कालच्या विजयानंतर दिल्ली आता गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचली आहे. असं असलं तरी आर अश्विनने गेल्या पाच सामन्यात केवळ एकच बळी पटकावला आहे. त्याला चार सामन्यात एकही बळी मिळवता आला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button