सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत ऑलिम्पिकला मुकणार
नवी दिल्ली : यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांना ऑलिम्पिकला मुकावे लागणार आहे. सिंगापूर ओपन ही टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी अखेरची बॅडमिंटन स्पर्धा होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी ही स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे सायना आणि श्रीकांत या स्टार भारतीय बॅडमिंटनपटूंच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. २००८ नंतर ऑलिम्पिकला मुकण्याची ही सायनाची पहिलीच वेळ असेल. तिने याआधी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये पार पडणार आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेपूर्वीच सायना आणि श्रीकांत यांच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा धूसर होत्या. आता सिंगापूर ओपन रद्द झाल्याने सायना आणि श्रीकांत टोकियो ऑलिम्पिकला मुकणार हे निश्चित झाले आहे. या दोघांच्या अनुपस्थितीत आता पी. व्ही. सिंधूच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. सिंधूला यंदा पदक मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
सिंगापूर ओपन स्पर्धा १ ते ६ जून या कालावधीत पार पडणार होती. परंतु, सिंगापूर बॅडमिंटन संघटना आणि जागतिक बॅडमिंटन फेडरेशन यांना ही स्पर्धा रद्द करावी लागली आहे. आयोजकांनी ही स्पर्धा सुरक्षितरित्या व्हावी यासाठी प्रयत्न केले. मात्र, जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खेळाडूंना प्रवास करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.