आनंद महिंद्रा यांच्याकडून भारताचा डावखुरा गोलंदाज टी. नटराजनला गाडी भेट !

मुंबई : नटराजनच्या शानदार बोलिंग फरफॉर्मन्सने खूश झालेल्या प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नटराजनला एक महिंद्रा गाडी देण्याची घोषणा केली होती. महिंद्रा यांनी आश्वासन पाळलं आहे. महिंद्रा यांनी पाठवलेली गाडी नटराजनला मिळाली आहे. गाडीचे काही फोटो नटराजनने ट्विट केले आहेत.
भारताचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज टी नटराजन ( T Natrajan) यॉर्कर टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. आयपीएल 2020 मध्ये केलेल्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर यंदाच्या साली झालेल्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं आणि शानदार गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ब्रिस्बेन कसोटी जिंकण्यात नटराजनचा महत्त्वाचा वाटा होता. त्याची हीच कामगिरी महिंद्रा यांना आवडली होती. त्यामुळे महिंद्रा यांनी त्याला गाडी भेट देण्याची घोषणा केली होती. अखेर आयपीएलआधी महिंद्रा यांनी त्याला गाडी भेट दिली आहे. गाडीसोबतचे फोटो ट्विट करुन नटराजनने महिंद्रा यांना धन्यवाद दिले आहेत. नटराजनने देखील आनंद महिंद्रा यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये जी जर्सी नटराजनने परिधान केली होती. त्या जर्सीवर सही करुन ती जर्सी त्याने महिंद्रा यांना दिली आहे.
भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा क्षण आहे. माझा प्रवास खूपच कठीण रस्त्याने झालाय. परंतु याच रस्त्यावर मला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळालं. त्याच बळावर मी चांगलं प्रदर्शन करु शकलो. आज मी महिंद्रा यांचं गिफ्ट स्वीकारतोय, त्या वेळी मला भरुन आलंय. त्यांच्याविषयी मला आदर आहे. त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी माझा प्रवास ओळखला आणि माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, अशा शब्दात नटराजनने आनंद महिंद्रा यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.