
टोक्यो : टोक्योमध्ये सध्या सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पदकाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या प्रवीण कुमारनं हाय जंप (उंच उडी) टी६४ प्रकाराच्या अंतिम सामन्यात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
प्रवीण कुमारच्या या रौप्य पदकासह टोक्योमधील भारताच्या खात्यातील पदकांची संख्या ११ झाली आहे. आतापर्यंत पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात यंदा भारताच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली आहे. टोक्यो पॅरालिम्पिक खेळांच्या सुरुवातीपासून प्रवीण कुमारला हाय जंप प्रकारात पदकाचा प्रवळ दावेदार समजलं जात होतं. प्रवीण कुमारनं सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत रौप्य पदकावर नाव कोरलं. एवढंच नाहीतर त्यानं उत्तम गुणांची कमाई करत आपला एशियन रेकॉर्डही कायम ठेवला आहे.
प्रवीण कुमारनं आपल्या तीन प्रयत्नांमध्ये सातत्यानं सुधारणा केली. प्रवीण कुमारनं आपल्या पहिल्या प्रयत्नात १.८३ मीटर उंच उडी घेतली. त्यानंतर त्यानं आपल्या दुसऱ्या प्रयत्नात १.९३ मीटर उंच उडी घेतली. तर तिसऱ्या प्रयत्नात प्रवीण कुमारनं स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढत २.०७ मीटर उंच उडी घेतली. प्रवीण कुमार आपल्या तिसऱ्या प्रयत्नात सुवर्ण पदकाच्या अत्यंत जवळ पोहोचला होता. प्रवीण कुमारनं २.०७ मीटरची उंच उडी घेतली आणि आपला एशियन रेकॉर्डही कायम ठेवला.




