
लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून सामन्याचा तिसरा दिवस इंग्लंडच्या फलंदाजांनी प्रामुख्याने इंग्लंडचा कर्णधार जो रुटने गाजवला. इंग्लंडने दिवसअखेर सर्वबाद ३९१ धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे इंग्लंडला या डावात २७ धावांची आघाडी मिळाली आहे. इंग्लंडकडून या डावात कर्णधार रुटने सर्वाधिक १८० धावांचं योगदान दिलं. तो नाबाद राहिला. त्याला जॉनी बेअरस्टोने चांगली साथ दिली. बेअरस्टोने ५७ धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर इशांत शर्माने ३ आणि मोहम्मद शमीने २ बळी घेतले.
जो रुटनं नाबाद १८० धावांची खेळी केली. जो रुटनं कारकिर्दीतलं २२वं शतक ठोकलं. भारताविरुद्ध त्याचं सातवं शतक असून सलग दुसरं शतक आहे. रुटने भारताविरुद्ध सलग ४ वेळा ५०च्या वर धावा केल्या आहेत. त्याने यापूर्वी २०१८ मध्ये केनिंगग्टन ओवल टेस्टमधील दुसऱ्या डावात १२५ धावांची खेळी केली होती. तर या मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात ६४ आणि १०९ धावांची खेळी केली होती.
केएल राहुलसोबत गैरवर्तन; प्रेक्षकांमधून फेकले शॅम्पेनचे कॉर्क
इंग्लंडमधील क्रिकेट चाहत्यांना सामान्यत: सभ्य समजलं जातं. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी याच्या विरुद्ध चित्र पाहायला मिळालं. सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारताच्या केएल राहुलवर शॅम्पनचे कॉर्क फेकल्याची घटना घडली. इंग्लंड खेळत असलेल्या पहिल्या डावातील ६९ व्या षटकादरम्यान हा प्रकार घडला. यावेळी मोहम्मद शमी इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला गोलंदाजी करत होता. या प्रकारामुळे काही काळ सामना थांबवण्यात आला. या प्रकारामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीने मैदानातच राग व्यक्त केला. शॅम्पेन कॉर्क जिथून फेकलं तिकडे परत फेक असं सांगताना तो व्हिडिओत दिसत आहे. आता इंग्लंड क्रिकेट बोर्ड उपद्रवी प्रेक्षकांवर कारवाई करते की नाही? याकडे लक्ष लागून आहे. या प्रकाराबद्दल भारतीय संघाने पंच मायकल गोफ आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांच्याकडे तक्रार केली आहे.




