दिल्ली कॅपिटल्सचा केकेआरवर दणदणीत विजय
पृथ्वी शॉचा धमाका : पहिल्याच षटकात ६ चेंडूत ६ चौकार, तर १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण

अहमदाबाद : पृथ्वी शॉने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. पृथ्वीने ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केलेल्या ८२ धावांच्या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाताचा ७ विकेट राखून पराभव केला. हा दिल्लीचा सात सामन्यांत पाचवा विजय ठरला. या सामन्यात कोलकाताने दिल्लीपुढे विजयासाठी १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना पृथ्वीने सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्याने शिवम मावीने टाकलेल्या डावाच्या पहिल्याच षटकात सहा चौकार मारले. त्याने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याला सलामीचा साथीदार शिखर धवनची (४६) चांगली साथ लाभली. अखेर या दोघांना, तसेच कर्णधार रिषभ पंतला (१६) पॅट कमिन्सने बाद केले. परंतु, दिल्लीने २१ चेंडू शिल्लक असतानाच हा सामना जिंकला.
या विजयासह दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत आरसीबीच्या संघाला मोठा धक्का दिला आहे. दिल्लीच्या संघाने या विजयानंतर गुणतालिकेत सर्वाधिक १० गुण पटकावले आहेत. या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाने सहा सामन्यांमध्ये चार विजय मिळवले होते, तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण या विजयानंतर दिल्लीच्या संघाने १० गुण झाले आहेत. गुणतालिकेत सध्याच्या घडीला दिल्ली, चेन्नई आणि आरसीबी या तिन्ही संघांचे समान १० गुण आहेत. पण सर्वाधिक रनरेटच्या जोरावर चेन्नईने अव्वल स्थान पटकावले आहे. या विजयानंतर दिल्लीने आरसीबीला गुणतालिकेत धक्का दिला असून त्यांनी दुसरे स्थान पटकावले आहे, तर आरसीबीच्या संघाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
तत्पूर्वी दिल्लीच्या संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि केकेआरला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला आणि केकेआरला मोठा धावसंख्या करण्यापासून रोखले. पण केकेआरकडून यावेळी शुभमन गिल आणि आंद्रे रसेल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. गिलने यावेळी तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावांची खेळी साकारली. पण गिलला यावेळी दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही. गिल बाद झाल्यानंतर आपल्या वाढदिवशी रसेलने धडाकेबाज फटकेबाजी केली. रसेलने यावेळी २७ चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ४५ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच केकेआरच्या संघाला १५४ धावा करता आल्या.
पृथ्वी शॉचा धमाका
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने चांगलाच धमाका केला. पृथ्वीने सामन्यातील दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकात ६ चेंडूत शानदार ६ चौकार चोपले. पृथ्वीने शिवम मावीच्या गोलंदाजीवर हे ६ चौकार लगावले. विजयी आव्हानाचे पाठलाग करायला दिल्ली मैदानात उतरली. पहिले षटक टाकायला शिवम मावी आला. मावीने वाईड चेंडू टाकत खराब सुरुवात केली. त्यानंतर पृथ्वीने मावीच्या ६ चेंडूवर मैदानातील विविध बाजूला शानदार ६चौकार लगावले.
पृथ्वी तिसरा फलंदाज
आयपीएलमध्ये पृथ्वी ६ चेंडूंवर ६ चौकार लगावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. पृथ्वीच्या आधी २०१२ मध्ये मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध एकाच ओव्हरमध्ये ६ चौकार लगावले होते. तसेच त्यानंतर २०१३ मध्ये ल्यूक राईटनेही अशीच कामगिरी केली होती.