कोलंबो : संघातील वरच्या फळीतील प्रमुख खेळाडू बाद झालेले असताना देखील अष्टपैलू खेळाडू आणि धोनीचा हुकुमी एक्का असलेल्या दीपक चहरने शेवटपर्यंत खिंड लढवून भारतीय संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर तीन गड्यांनी मात करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी आघाडी घेतली. सामन्यात एकवेळ अशी आली होती की भारताचा पराभव होईल असं वाटत होतं पण दीपकने सामन्याची सूत्रं हातात घेऊन सामना भारताच्या बाजूने झुकवला. श्रीलंकन संघाने भारताच्या प्रमुख खेळाडूंना बाद केलं, पण एकटा दीपक श्रीलंकेवर भारी पडला.
श्रीलंकेच्या ९ बाद २७५ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचा निम्मा संघ ११६ धावांवर माघारी परतला होता. सूर्यकुमार यादवनं वन डे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावताना कृणाल पांड्यासह टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. पण, ही दोघं माघारी परतली अन् श्रीलंकेचा संघ निर्धास्त होऊन, विजय आपलाच असा बागडू लागला. पण, दीपक चहरनं त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडवला. त्यानं वन डेतील पहिले अर्धशतक झळकावताना उपकर्णधार भुवनेश्वर कुमारसह संघर्ष केला. प्रचंड दडपणातही चहरनं अफलातून खेळी केली. ४७ व्या षटकात त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले, तरीही त्यानं संघर्ष केला. ७ बाद १९३ वरून दीपक-भुवीनं सामना खेचून आणला. या दोघांमुळे श्रीलंकेच्या ताफ्यात ‘कभी खूशी, कभी गम’ असे वातावरण झाले.
टीम इंडियाच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो दीपक चहर ! संघाचे प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर भारत सामना हरणार असं चित्र निर्माण झालं होतं. त्याच वेळी मैदानात चहरची एन्ट्री झाली आणि त्याने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. चहरने ६९ धावा केल्या. चहरने एकेरी दुहेरी धावा काढत घेत संधी मिळेल तसे आक्रमक फटकेही लगावले. भुवनेश्वर कुमारने त्याला उत्तम साथ दिली. याशिवाय सूर्यकुमार यादवने देखील अर्धशतकी खेळी करत आपली छाप सोडली. कृणाल पांड्या ३५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये मध्ये परतला. कृणाल पांड्याने ३५ धावा केल्या.
दीपक चहर आयपीएल संघात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळत असलेला दीपक वेळोवेळी आपली छाप सोडतो. बऱ्याच वेळा बोलिंगमध्ये धोनीनं हुकमी एक्का म्हणून त्याचा वापर केला आहे. अगदी संघाला पाहिजे तेव्हा तो विकेट्स मिळवून देतो. चेन्नईकडून खेळत असताना चहरवर बॅटिंगची तितकीशी वेळ येत नाही. परंतु आज त्याला संधी मिळताच त्याने बॉलिंगबरोबर बॅटिंगमध्ये देखील कमाल करून दाखवली.
तत्पूर्वी, कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अविष्का फर्नांडो ( ५०) आणि मिनोद भानूका ( ३६) यांनी श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. धनंजया डी सिल्व्हा ( ३२), चरिथ असलंका ( ६५) आणि चमिका करुणारत्ने ( ४४*) यांनी श्रीलंकेला ५० षटकांत ९ बाद २७५ धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी धडाकेबाज सुरुवात केली. पण, तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर फिरकीपटू वनिंदू हसरंगानं त्याचा त्रिफळा उडवला. पृथ्वीला १३ धावांवर माघारी जावं लागलं. इशान किशनही ( १) फेल ठरला. मनिष पांडे व शिखर यांनी सावध खेळ करताना टीम इंडियाची धावसंख्या हलती ठेवली. पण, वनिंदूनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला, त्यानं धवनला २९ धावांवर पायचीत पकडले.
मनिष पांडे व सूर्यकुमार यादव यांनी झटपट खेळी करताना धावांचा वेग वाढवला. या दोघांनी ३१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. मनिष चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु दुर्दैवीरितीनं त्याला माघारी जावं लागलं. शनाकाच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारनं स्ट्रेट ड्राईव्ह मारला, पण शनाकाच्या हाताला लागून तो नॉन स्ट्रायकर एंडला यष्टींवर आदळला. मनिष क्रिजच्या बाहेर आला होता आणि तिसऱ्या अम्पायरनं त्याला बाद ठरवले. त्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याचा रिटर्न कॅच शनाकाकडून सुटला. मनिष ३१ चेंडूंत ३ चौकारांसह ३७ धावांवर बाद झाला. पण, पुढच्याच षटकात हार्दिक झेलबाद झाला.
सूर्यकुमारनं अर्धशतक पूर्ण करत टीम इंडियाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या, परंतु लक्षण संदकन यानं त्याला पायचीत पकडले. सूर्या ४४ चेंडूंत ६ चौकारांसह ५३ धावांवर बाद झाला. कृणाल पांड्याकडून अखेरच्या होप्स होत्या, परंतु हसरंगानं त्याला पायचीत केले. कृणाल ३५ धावांवर बाद झाला अन् टीम इंडियाच्या पुनरागमनाच्या आशाही मावळल्या होत्या. भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर यांनी श्रीलंकेच्या गोटात तणावाचे वातावरण निर्माण केलं. चहर सुसाट सुटला, प्रचंड आत्मविश्वासानं तो श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत होता. त्यानं ६६ चेंडूंत वन डेतील त्याचे पहिले अर्धशतक झळकावले. वन डे क्रिकेटमध्ये ८ ते ११ क्रमांकावर फलंदाजी करून अर्धशतक झळकावणारा चहर हा भारताचा ११वा खेळाडू ठरला.
४७ च्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यष्टिरक्षकाकडून भुवीचा झेल सूटला अन् चेंडू सीमापार गेला. भारताला २४ चेंडूंत २९ धावा हव्या होत्या आणि तेव्हा हा चौकार मिळाला. मांडीचे स्नायू ताणले गेल्यानं दीपकनं प्रथोमचार घेतले, परंतु संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो खेळपट्टीवर नांगर रोवून उभा राहिला. अखेरच्या तीन षटकांत संघाला १६ धावा हव्या होत्या. ४८व्या षटकात केवळ एक धाव घेता आली. वनिंदू हसरंगानं १० षटकांत ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. १२ चेंडूंत १५ धावांची गरज असताना भुवीनं पहिल्या चेंडूवर एक धाव काढली अन् दीपकनं पुढच्या चेंडूवर चौकार खेचला. अखेरच्या षटकात टीम इंडियानं विजयासाठी असलेल्या ३ धावा सहज काढल्या. दीपकनं ८२ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह नाबाद ६९ धावा केल्या. भुवीनं नाबाद १९ धावा करून त्याच्यासह ८ व्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली.