स्पोर्ट्स

कोलकाता नाइट रायडर्सचा पंजाब किंग्सवर विजय; पराभवांची मालिका खंडित

अहमदाबाद : कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्सवर विजय मिळवला. या सामन्यात कोलकात्याने पंजाबवर ५ गडी आणि २० चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासोबतच कोलकात्याने यंदाच्या स्पर्धेतील पराभवांची मालिका खंडित करत दुसरा विजय मिळवला आहे. या विजयासह गुणतालिकेत तळाला असलेल्या केकेआरने गुणतालिकेत मोठा बदल केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यापूर्वी केकेआरचा संघ हा गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर गुणतालिकेत त्यांनी मोठी झेप घेतली आहे.

इंडियन प्रीमियर लीगस्पर्धेतील हा २० वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. कोलकात्याचा कर्णधार ओईन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय कोलकात्याच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. पंजाबच्या सलामीवीरांनी संयत सुरुवात केली खरी, पण पहिली विकेट पडल्यावर मात्र एकामागून एक त्यांचे फलंदाज बाद होत गेले. पंजाबचा कर्णधार लोकुश राहुल हा १९ धावांवर बाद झाला आणि त्यांच्या संघाला पहिला धक्का बसला. राहुल बाद झाल्यावर पंजाबचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले. ख्रिस गेलला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. धडाकेबाज फलंदाज दीपक हुडाला यावेळी एका धावेवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर मोइसेस हेनरिक्स आणि शाहरुख खान यांनाही मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. पण ख्रिस जॉर्डनने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केल्यामुळे पंजाबला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला निर्धारित २० षटकात केवळ १२३ धावा जमवता आल्या. पंजाबकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक ३१ तर ख्रिस जॉर्डनने ३० धावांची खेळी केली. तर कोकलात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने ३ तर पॅट कमिन्स, सुनील नारायण या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावीने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

१२३ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या. कोलकात्याची सुरुवात वाईट झाली. कोलकात्याने तीन षटकात १७ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. परंतु त्यानंतर कर्णधार ओईन मॉर्गनने आणि राहुल त्रिपाठीने सावधपणे फटकेबाजी करत संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले. अखेर मॉर्गनने कोलकात्याला विजय मिळवून दिला. कोलकात्याकडून ओईन मॉर्गनने सर्वाधिक ४७ धावांची नाबाद खेळी केली. त्याला राहुल त्रिपाठीने ४१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली.

या सामन्यापूर्वी केकेआरच्या संघाने पाच सामने खेळले होते आणि त्यांना चार सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे एका विजयामुळे त्यांना गुणतालिकेत आठवे स्थान पत्करावे लागले होते. पण या विजयानंतर मात्र केकेआरने गुणतालिकेत मोठा बदल करत पाचवे स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी पंजाबचा संघ हा पाचव्या स्थानावर होता आणि पराभवानंतर त्यांची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button