११ वी साठी १५ टक्के शुल्क कपातीचा निर्णय; शिक्षण विभागाची माहिती
मुंबई/पुणे : शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. १५ टक्के प्रवेश शुल्क सवलतीबाबत शिक्षण विभागाकडूनच निर्णय जाहीर करण्यात आलाय. या निर्णयानुसार अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्कात विद्यार्थ्यांना ही सूट मिळणार आहे. या प्रवेश शुल्कातील कपातीमुळे विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळालाय.
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रवेश प्रक्रियांमध्ये राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी कपात केलेल्या शुल्कानुसार शुल्क घ्यायचे आहे. त्यामुळे आगामी काळात या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते याकडेही लक्ष असणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी सरकारचा निर्णय झालेला असतानाही विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क घेण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी आल्यात. त्यामुळे अकरावीसाठीचा निर्णय कसा लागू होतो हे महत्त्वाचं ठरणार आहे.
अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिल्या गुणवत्ता यादीची प्रक्रिया पूर्ण
मुंबई विभागाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिला गुणवत्ता यादीची प्रक्रिया पूर्ण झाली असून पहिला गुणवत्ता यादीत ५८,५०८ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये आपले प्रवेश निश्चित केले आहेत. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी १७ ऑगस्ट रोजी जाहीर झाली होती यामध्ये १ लाख १७ हजार ८३३ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय मिळाले होते. ज्या विद्यार्थ्यांना या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालय मिळाले त्यांनी आपला प्रवेश ३१ ऑगस्टपर्यंत निश्चित करायचे होते.
ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले नाही त्यांना आता दुसरी गुणवत्ता यादीमध्ये पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची वाट पहावी लागणार आहे. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे पहिल्या गुणवत्ता यादीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा दुसर्या गुणवत्ता यादी मध्ये सहभागी होऊन महाविद्यालयांचे पर्यायी पसंती क्रमांक द्यायचे आहेत.
पहिला गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले अशा विद्यार्थ्यांपैकी ६,७३५ विद्यार्थ्यांनी कला शाखेत, २८ हजार २२० विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत तर २२ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत अकरावीसाठी प्रवेश निश्चित केले आहे.