मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात तब्बल सव्वा दोन तास खलबतं या बैठकीत झाली. या बैठकीत लॉकडाऊनवर निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, निर्णय झालेला नाही. परंतु राज्यात दोन आठवडे लॉकडाऊन लागण्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत. राज्यात लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच त्यांनी तज्ज्ञांच्या १४ दिवसांच्या लॉकडाऊनला समर्थन केलं आहे. दरम्यान, उद्या मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या राज्यातील कोविड १९ टास्क फोर्स सोबत बैठक करून वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी किती दिवस लॉकडाऊन करणार याचा निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनचा सूर दिसला. या बैठकीत मुख्यमंत्री लॉकडाऊन करण्यावर जास्त भर देताना दिसले. १४ दिवसांचं लॉकडाऊन असावं असं तज्ज्ञांचं मत आहे. मुख्यमंत्री म्हणून मी या मताशी सहमत आहे. कोरोनाचा गुणाकार थांबवला पाहिजे. ताबडतोबीने पावलं टाकली पाहिजेत. किती आरोग्य सुविधा वाढवू शकू याचा विचार झाला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
चांगल्या सूचना आल्या आहेत मी त्याची नोंद घेतली आहे. कडक निर्बंध हवेत आणि सूटही पाहिजे हे दोन्ही गोष्ट एकत्र शक्य नाही. आता तरी आपल्याला कडक निर्बंध करुन थोडी कळ सोसावी लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. व्यापऱ्यांशी मी बोललो. होम डिलिव्हरी, टेक अवेला दोन तीन दिवस लागतील. सुरुवातीला कडक निर्बंध लावू.
त्यानंतर ८ दिवसांनी एक एक गोष्ट सुरू करू. कडक निर्बंध लाऊ, ८ दिवस लाऊडाऊन हा सध्या मार्ग आहे, असं मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले. जो नवीन स्ट्रेन आहे तो व्हॅक्सिननेही थोपवला जात नाहीये, कडक निर्बंधाशिवाय पर्याय नाही, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. दोन डोस घेऊन सुद्धा अजून माझ्या शरिरात अँटी बॉडी तयार झाल्या नाहीत. आज काही तरी निर्णय घेण्याची आवश्यकता, असं मुख्यमंत्री म्हणाले.
१५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजिनचा तुटवडा जाणवू शकतो. कोव्हिडसाठी ९६० मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी आहे. अद्याप १२०० मेट्रिक टन राज्याची उत्पादन क्षमता आहे. तसंच रेमडिसीव्हरचा तुटवडा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. लॉकडाऊनची वेळ आली आहे दुसरा कोणता पर्याय नाही. आम्ही कुठे कमी पडतो आहे का? असे केंद्र सरकारला विचारणा करीत आहोत. लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कळत नकळत प्रसार हा फार घातक आहे. तरुण वर्ग जास्त बाधित होत आहे हे आढळून येत आहे. आपल्याला रुग्ण वाढ थांबवायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गैरसमज पसरवणाऱ्यांशी चर्चा काय करायची?
संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी कोरोना हा रोगच नाही, जे मृत पावले ते जगायच्या लायकीचे नव्हते, असं विधान केलं होतं. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी चांगलंच फटकारलं. कोरोना हा रोगच नाही असा गैरसमज पसरवणारे आहेत, अशा लोकांशी काय चर्चा करायची? कोरोनाचा गुणाकार थांबवला पाहिजे. ताबडतोबीने पावलं टाकली पाहिजेत. किती आरोग्य सुविधा वाढवू शकू याचा विचार झाला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचा पूर्ण लॉकडाऊनला विरोध
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. व्यापाऱ्यांच्या व जनतेच्या भावना लक्षात घ्या आणि मगच योग्य तो निर्णय घ्या, असे फडणवीस यांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे मागील वर्ष वाया गेले. व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच जनतेला कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत. हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेस नेत्यांची भूमिका
राज्यातील आजच्या स्थितीत लोकांचा जीव वाचवण्याला प्राथमिकता दिली पाहिजे, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. हातावर पोट असणाऱ्यांचा विचार करावा लागेल. मृत्यू थांबवण्यासाठी सर्वोत्तम उपाय करा. वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागले तरी तो स्वीकारायला हवा, असंही पटोले यांनी म्हटलंय. राज्यात कटू निर्णयाची अंमलबजावणी केली तरत कोरोनाची साखळी तुटेल. गुजरातमधून रेमडेसिव्हीरचा साठा मिळू शकला तर पाहावा. देवेंद्र फडणवीसही या बैठकीला उपस्थित आहेत. असं बाळासाहेब थोरात म्हणाले. तर राज्यात आव्हानात्मक परिस्थिती आहे. लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध लावायचे असतील तर गरीबांचं नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊन नको आणि सर्व सुरुही नको, मध्यबिंदू काढा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
सर्वांचं ऐकूण जो निर्णय घ्याचा आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा. आमचं सहकार्य असेल. पण, राज्यासाठी जो निर्णय घेतला जाईल. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश करू नये. एक आठवड्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडला त्यातून वगळण्यात यावे. निर्णय लागू करू नये. स्थानिक प्रशासनच्या स्तरावर निर्णय घेऊ, असं पवार म्हणाले.
लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. गरीबांना मदत देण्याची माझी भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच ऑक्सिजन संदर्भात नियमावली केली पाहिजे. रेमडीसीव्हिरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. काही ठिकाणी एमबीबीएस डॉक्टरचं मानधन कमी आहे. काळाबाजार थांबवायला आपण यशस्वी झालं पाहिजे, असंही ते म्हणाले.